Search This Blog

Showing posts with label मराठी कविता. Show all posts
Showing posts with label मराठी कविता. Show all posts

Tuesday, July 12, 2022

सैरभैर प्रवाह

आसवांची सरिता सैरभैर प्रवाह
बेभान होऊनिया वाहते
सागरासंगे अजूनही दुरावा
तिला थांबवू नका भिंतींनो
क्रोधाने उफाळेल जलप्रवाह
नको संयमाची तिच्या परीक्षा
फुटतील बांध जलाशयाचे
वाट तिची कड्या-कपारींची
नाद आसवांचा चौफेर दाटला
अस्वस्थ मनाने चिरून पाषाणाला
सरितेची लगबग मिळाया सागराला
पुराने जाहला तिचा आसमंत
लांबच लांब अजूनही वाट घनदाट
आसवांची सरिता सैरभैर प्रवाह

- रानमोती / Ranmoti
   

बनू अजिंक्य..!

बनू अजिंक्य पताका गडाची 
आम्ही मराठी हाडा मासाची
सळसळत्या रक्त बाण्याची 
उडत उडत कुठवर जगायचे
आता जगणे आमुचे ध्येयाचे 
घे भरारी स्वप्ने बांधुनी उराशी 
एकीचे बळ धरू हात हाताशी
 बनू अजिंक्य पताका गडाची 
आम्ही बछडे या महाराष्ट्राची
खळखळ उसळत्या सागराची 
धमन्यात आमुच्या जयजयकार 
हृदयात निरंतर झंकार 
उघडत्या पापण्यांचे स्वप्न जिंकण्याचे 
माझे तुझे तिचे त्याचे सर्वांचे 

- रानमोती / Ranmoti




Monday, July 11, 2022

आनंद गगनात...

पहाटे पहाटे, सूर्याचे किरण, भेटाया आले
रूपाने तुझ्या, बोलाया लागले,
सळसळत्या वाऱ्यातं
धुंद या गाण्यातं
पावसाच्या पाण्यातं
मन माझे प्रेमातं...
अन आनंद गगनातं...आनंद गगनात...

बाहेर वादळं, मनात विसावा
पौर्णिमेचा चंद्र, नयनी दिसावा
लखलखत्या ताऱ्यातं
फुलांच्या गंधातं
शांत काळोखातं
मन माझे प्रेमातं...
अन आनंद गगनातं...आनंद गगनात...

थरथरत्या लाटांनी, किनारे भिजावे
निसटत्या वाळूतून, शिंपले निघावे
मोत्याच्या शिंपल्यातं
सागराच्या पाण्यातं
न्हाव्याच्या होडीतं
मन माझे प्रेमातं...
अन आनंद गगनातं...आनंद गगनात...

मंद मंद दुपार, प्रकाश नादावली
सावलीत वृक्षांच्या, पाखरे गारावाली
उन्हांच्या झळातं
ऊसाच्या मळ्यातं
मातीच्या गाळातं
मन माझे प्रेमातं...
अन आनंद गगनातं...आनंद गगनात...

- रानमोती / Ranmoti

Monday, December 6, 2021

ज्ञानमोती

ज्ञान सागरातुनी ज्ञानमोती फुलला
करण्या सार्थ जीवा दिनरात झटला
सांगुनी सत्यपथ सारा विश्व फिरला
भारतरत्नाने तो विश्वरत्न नटला
ज्ञान सागरातुनी ज्ञानमोती फुलला

अंधारल्या वाटेला प्रकाशुनी निघाला
उच्चनिचतेच्या सरीने नजाणे कितीक भिजला
होण्या समान सारे पेटुनी तो उठला
झाला सुखी जन न्यायास जो मुकला
ज्ञान सागरातुनी ज्ञानमोती फुलला

शोधण्या सत्य पथाला फुले शिष्य बनला
धुडकावूनी रूढी परंपरा मनुस्मृतीशी नडला
गणतंत्र दाऊनी जना महायोगी गणला
त्यागुनी स्वधर्म बुद्ध पायी नमला
ज्ञान सागरातुनी ज्ञानमोती फुलला

उठ रे जना तू सरसावण्या स्वत:ला
लढण्याआधीच भल्या असा का दमला
चालुनी नव वाटेला अज्ञानाने का हेरला
विसर का पडला तुजसाठी संविधान रचला
ज्ञान सागरातुनी ज्ञानमोती फुलला

- रानमोती / Ranmoti




Monday, June 21, 2021

जांभई..


कंटाळपणाचे लक्षण जांभई
येताचं सारे शरीर शांत होई
निजवार डोळे जांभई येताच कळले
आटपून सारे बिछान्याकडे वळले

घेताच लपेटूनी चादरीला
निद्रेचा खेळ डोळ्यात बहरला
डोक्यात नवे स्वप्न रंगले
फुलवत वेडे मनही दंगले

हळूच नयनी काळोख जडला
दिवसभराचा थकवा संपला
समाधानात गाढ झोप लागली
विश्वाची साऱ्या शांती लाभली

Friday, June 4, 2021

तत्त्व एक आहे


तुझी हिरवळ
तुझी गारपीट
तुझा ओलावा
तुझा कोरडा उन्हाळा

कधी दुखावतो
कधी सुखावतो
कधी सोसावतो
कधी भुरळ घालतो

थोडी किलबिल
थोडी शांतता
थोडी भक्ती
थोडी युक्ती

तुझी निरागस
रहस्य शक्ती
माझ्यावरती
असीम भक्ती

तुझे रागावणे
थंड हवेचे गोंजारणे
सारेचं असीम आहे
माझे निसर्गावर प्रेम आहे

वाटतं तुला 
असंच जपावं
असंच गोंजारावं
तुझ्यात असचं रमावं
असंच खेळावं

कारण
तुझे नी माझे
तत्त्व एक आहे
जीवनाचे रहस्य 
फक्त तूच आहे




Monday, May 31, 2021

मला थोडा उशीर होईल



मी जो रस्ता निवडला आहे,
त्याचा शेवट गाठायचा ध्यास आहे
ऐकलं आहे ! 
दूर दिसणाऱ्या डोंगरा पल्याड,
त्याने वाकडे तिकडे वळण घेतले आहे
रस्ताने चालताना, 
अंधार प्रकाशाचा खेळ, 
चालूचं राहणार आहे
जातांना तुला काही सांगायचं आहे
मला थोडा उशीर होईल,
पण, मी नक्की परत येणार आहे
 
मी तुझा निरोप घेईल, 
तेव्हा सकाळ असेल
परंतु, सायंकाळ होऊन,
अंधार पडायला वेळ लागणार नाही
त्या लक्ख काळ्या अंधारात,
कोल्ह्यांची कोल्हेकुई
आणि वाघाच्या डरकाळ्याही ऐकायला येतील
तेव्हा भीतीचा थरथराट सुटून
तुझा एकटेपणचा वनवा, 
पेटायला वेळ लागणार नाही
मला थोडा उशीर होईल,
तोवर, तू तग धरून थांबशील ना ?
 
खात्रीने तू वाघिणीच्या धाडसाने
रात्रीच्या अंधाराला भिडशीलही
परंतु, सकाळच्या कोवळ्या सुंदर किरणांनी
आणि फुलांच्या सुगंधाने 
तुला मोहित केले तर
तु ज्या वळणावर मला निरोप दिला
तेथे तुझे वळण माझ्या दिशेने 
बदलायला वेळ लागणार नाही
मला थोडा उशीर होईल,
पण, तू बदलणार नाही ना ?

ध्येय प्राप्तीनंतर,
आलेल्या कटू गोड अनुभवांना 
एक एक करून उजाळत
तू दिलेल्या त्यागाला आठवत
क्षणभरातच परतीचा रस्ता पकडेल
प्रवास लांबणीचा आहे
परंतु, संपायला वेळ लागणार नाही
परत नक्कीच येणार, 
वचनबद्ध आहे !
मला थोडा उशीर होईल,
तोवर, तू वाट पाहशील का ?

- रानमोती / Ranmoti

Sunday, May 16, 2021

.....रडाया लागलं !


आभाळ आज धो धो रडाया लागलं
जाण्याने तुझ्या मन त्याचंही दुभागलं

भन्नाट सुटला वारा हा असा कसा
घेऊन गेला आमच्या लाडक्या माणसा
 नयनी ढगांच्या घट्ट काळोख दाटला
विजांनी कडकड दु:खी टाहो फोडला

संयमी शांत तुझ्या कर्माचे सुत्र
गावचा एक तुच लाडका भुमीपुत्र
छोट्याश्या जीवनाला तू केलं मोठं
विरोधकांनाही प्रेम दिलं जाणवलं छोटं  

गेलास तू चुकवून काळजाचा ठोका
कोणी सांभाळावं तुझ्या भाबडया लोका
दीन जणांचा कैवारी तू श्रध्देची आशा
मृत्युच्या वादळाने केली आज निराशा

गावच्या मातीत तुझ्या यशाच्या खुणा
तुझ्याविना विकास कोण घडवेल सांग ना
परतुनी ये पुन्हा आमच्या वाट्याला
मुखाग्नी दे दु:खाच्या प्रचंड साठ्याला

रिकामी जागा भरुन कशी निघणार
अंधारले डोळे सांग कधी तु दिसणार
जाण्याने तुझ्या मन त्याचंही दुभागलं
आभाळ आज धो धो रडाया लागलं

- रानमोती / Ranmoti


Thursday, May 13, 2021

रुजव जरा काळजात....


हे मराठी माणसा नको भांडू आपसात
स्वराज्य टिकविले संभाने रुजव जरा काळजात

तुकडे झाले चार पाच अन हजार
तरी नाही कुठलाच पराक्रमाचा बाजार
कसे असेल ते जगणे अन मरणे
समजून घ्यावे स्वतः सांगावे न लागणे

राजे आम्ही फक्त कहाण्या ऐकल्यात
आपण मात्र त्या प्रत्यक्षात भोगल्यात
स्वराज्याचा पेलला उरावर डोंगर
लढायांचा नजाणे कसा हाकलास नांगर

राजे आयुष्य जरी तुम्हाला लाभले लहान
जिद्द आणि धाडसाने कर्तुत्व जाहले महान
क्रूर औरंगजेबाने जरी तुमचे डोळे काढले
आत्मविश्वासाने तुमच्या मात्र त्यास येथेच गाडले

आम्ही फक्त मालिका पाहिल्यात
आपण मात्र अनंत वेदना साहल्यात
हे मराठी माणसा नको भांडू आपसात
स्वराज्य टिकविले संभाने रुजव जरा काळजात

- रानमोती / Ranmoti



Wednesday, May 12, 2021

रख रख रान..


रख रख रान
हरवला प्राण
तहानली गाय
सुकली माय

अनवाणी पाय
निरखून जाय
तापला रवी
अंगार लावी

कुठून आणू
स्वासाचा वारा
जीव झाला जणू
डोक्यावर भारा

दूरच्या रानात
काटेरी बाभूळ
फाटली धरणी
उघडं झालं मूळ

आडोसा सावलीचा
पदर माऊलीचा
कधी संपेल वनवा
कोरड्या घासाचा

रिकामी घागर
कडक दुपार
वणवण चाले नार
तुडवत शिवार

पाण्याचा टाहो
फुटला घरात
रिकामी भांडी
वाजली जोरात

माठाच्या तळाशी
पाण्याचा गाळ
गळून पडला
बाळाचा नाळ

उपाशी पोटी
गाईचं कोरडं थान
हंबरडा फोडत
हरवू लागली भान

लहानग्या वासराच्या
ओल्या झाल्या कडा
श्रीमंताच्या वाड्याला
शेणा मातीचा सडा

भांडायला देवा तुला
ना उरला त्राण
तुझं रख रख रान
माझा हरवला प्राण

- रानमोती / Ranmoti

Tuesday, April 20, 2021

अखंड महाराष्ट्र एक नजर..


अखंड महाराष्ट्र एक नजर
सांगते विरासत ऐका बखर
लढवय्या प्रांत माझा कणखर
देशाचा प्राण प्रसिद्ध जगभर

छत्रपती रुपी एक महाराजा
तटस्थ जणू सहयाद्री भुजा
अडवीला उसळता पामर
 असो जय महाराष्ट्र गजर

मुकुट शोभिला सातपुडा
डोलती कौलतीरीं कडा
नयनी कृष्णा गोदावरी
नेसली पैठणी भरजरी

सुरेल मराठी बोली भाषा
वाजती चौघडे अन ढोल ताषा
नाशिका विराजती त्र्यंबकेश्वर
मराठवाडा मुक्कामी घृष्णेश्वर

कुलदेवता पंढरीच्या नाथा
वैभव समृध्द तो घाटमाथा
भारत मातेच्या जणू गर्भात
खनिज संपत्ती गडगंज विदर्भात

कोल्हापुरी पंचगंगा येती संगमा
जळगावी केळी दाटल्या हंगामा
कोकणी राजा रसाळ हापूस
यवतमाळी बोंडी फुटला कापूस

टोकाला सातारा अन सोलापूर
महाराष्ट्रावर जणू मायेची चादर
भिवापुरी मिरची तोफेची गोळी
स्वादिस्ट लाभली मधुर पुरणपोळी

नांदेडी आस्थापित गुरु गोविंद
यात्रा जोतिबा देई परमानंद
उल्कापाताचे लोणार सरोवर
धन्य ही महाराष्ट्राची धरोहर

पुण्याची शान शनिवार वाडा
साष्टांग नमन शिवनेरी गडा
बांधुनी केशरी स्वाभीमानी फेटा
सज्ज सिंधुदुर्ग रोकण्या लाटा

वन्यप्राणी विहार करती ताडोबा
राजधानी मुंबई सर्वांचा घरोबा
सागरी वारे वाहतात भराभरा
थंडावी महाबळेश्वर अन चिखलदरा

समुद्र सपाटी सजली रत्नागिरी
उंच डोंगरात लुप्त मुक्तागिरी
विसरुनी जगाचे ब्रह्मज्ञान
शांत बसला अलिप्त माथेरान

डोक्यावर रचला नंदुरबार
लावणी नृत्यात फटाकडी नार
करी माणसे वेडे अन खुळे
दुग्ध सरीतेत न्हालं धुळे

अकोला वाशीम मध्यघाट पातूर
शिक्षणाचं पॅटर्न प्रसिध्द लातूर
कुठे सुटली लाडकी सांगली
गोजिरी भीमा हळुवार रांगली

अनंत हा महाराष्ट्राचा वसा
सांगू तुम्हा किती अन कसा
जर दुखलं कुणाचं नाक अन घसा
लवकर घ्या कोरोनाच्या लसा

अखंड महाराष्ट्र... जय महाराष्ट्र...!

- राणी मोरे (उलेमाले) 

Friday, April 9, 2021

माई तुला आठवल कोण ?


झिरपला जीव साचलं गं सोनं, 
सांग माई तुला आठवल कोण ?

मातीच्या गोळ्याला घडवल कोण
सांग माई तुला आठवल कोण ?
चिमुकल्या पावलांना चालवल कोण
सांग माई तुला आठवल कोण ? 

घासातला घास भरवल कोण
सांग माई तुला आठवल कोण ? 
बोबडी ती भाषा समजल कोण
सांग माई तुला आठवल कोण ? 

डोळ्यातले आसू पुसेल कोण
सांग माई तुला आठवल कोण ?
प्रेमाची थाप लागवेल कोण
सांग माई तुला आठवल कोण ?

यशाचा मार्ग दाखवल कोण
सांग माई तुला आठवल कोण ? 
आनंदाच्या क्षणांना सजवल कोण
सांग माई तुला आठवल कोण ?

झिरपला जीव साचलं गं सोनं, 
सांग माई तुला आठवल कोण ?

- रानमोती / Ranmoti

Monday, April 5, 2021

माझ्या रिकाम्या आभाळी..



माझ्या रिकाम्या आभाळी,
तुझे भरलेले ढग
ओल्या सरींनी भीजले,
कोरड्या मातीचे हे जग

काळ्या रात्रीच्या गगनाला,
तुझ्या नक्षत्रांचा घेर
काळोखात लपलेल्या ढगांना,
लखलखत्या विजेचा वार

रखरखत्या उन्हात,
जणू सुकलेले झाड
गार वाऱ्याच्या रुपाने,
तू पुरवी मायेने लाड

माझ्या उसळत्या लाटांना,
तुझा संयमाचा किणारा
सुन्या खडकाळ कडांना,
साथ देई अमृताचा झरा

माझ्या तापलेल्या तव्यावर,
तुझी भुकेची भाकर
थंड पोचट दुधात,
चवीला मधुर साखर,

ऐकटा हा ऐकांत,
माझे गीतही शांत
तुझ्या सुरेल सुरांनी,
गुणगुणला आसमंत

- रानमोती / Ranmoti


Monday, February 22, 2021

देव जाणला ..!


एक संत जणू भगवंत
हाती झाडू असे कीर्तिवंत
करी सदैव राष्ट्र निर्मळ
मानुनी मानवता धर्म केवळ

पटविले महत्त्व शिक्षणाचे
घेऊन नाव भंगवंताचे
अंधश्रद्धेवर करून घणाघात
भांडू नका म्हणे आपसात

ठिगळे जरी होती वस्त्राला
दिनदुबळ्या धर्मशाळा बांधी आश्रयाला
सांगत असे पवित्र मंत्र जगाला
गोपाला गोपाला देवकीनंदन गोपाला

न मिळविता कुठला मेवा
रंजल्या गांजल्याची केली सेवा
तोची साधू मी मानला 
गाडगे बाबातच देव जाणला

Sunday, January 3, 2021

उगवली ज्योती..!


लखलखण्या चांदण्या 
उगवली ज्योती 
दाह करुनी जीवाचा 
वाटिले ज्ञानाचे मोती 

मते नव्हती अनुकूल परी 
माता चालली निष्ठेने 
जग गाजविती चांदण्या 
आपुल्या ज्ञान प्रतिष्ठेने 

केले श्रद्धेने प्रबोधन 
घेऊन सत्याला ओठी 
ज्ञानपथ खोलण्या लेकींना 
जगली माय ती मोठी 

प्रकाशुनी हे भारतवर्ष 
मग मावळली ज्योती 
पुण्य स्मरणात मातेच्या 
बोला जय जोती ! जय क्रांती !!

Tuesday, November 24, 2020

वर्गातला बंडू


गोष्ट आहे माझ्या वर्गातल्या बंडूची 
नवीन आलेल्या बाईची 
एक दिवस शाळेत 
झाली जरा घाई 
नवीन होत्या बाई 
नाव त्यांचे बापट 
बंडूला मारली चापट 
हातात होती छडी 
बंडूला वाटली बेडी 
डोळयातुन राग गाळत 
चष्मा सांभाळत 
बाई म्हणाल्या बंडूला 
ताठ उभा रहा 
फळयाकडे पहा 
नीट कर नाडा 
बंद कर राडा 
लवकर म्हण आता 
बे चा पाढा 
बंडू थोडा कापला 
उभ्यातच वाकला 
नजर त्याची भेरकी 
घेत होती गिरकी 
वहीत लिहीलेल्या पाढ्यावर 
स्थिरावला त्याचा डोळा 
घाई घाई त्याने 
पाढा केला गोळा 
आणि सुरु झाला 
बे एके बे 
बे दुणे चार 
तिसऱ्याच अंकावर 
बंडू झाला गार 
हे बघून सारं 
बाई झाल्या सुरु 
काय रे बंडू 
आहे नुसता झेंडू 
बंडू होता धीट 
उभा राहुन नीट 
विनंती करुन म्हणाला 
चुकलं माझ जरा 
आज माफ करा 
ठेऊन सारं भान 
अभ्यास करीन छान 
तेवढ्यात वाजली घंटा 
संपला होता तंटा 
दप्तर गुंडाळत 
थोडासा रेंगाळत 
बंडू गेला पळून 
मुले मात्र त्याला 
पाहत होती वळून



Sunday, November 22, 2020

मुंगी...


आई मला आई मला एक गोष्ट सांग 
चालतांना मुंगी का गं करते रांग ? 

मुंगी बाई असते लई शिस्तप्रिय 
लहान असण्याचं तिलाच असते श्रेय 

वेळेचं तिला नेहमी असते भान 
कष्टाला तिच्या नसते कधी वाण 

मोकळं जरी असलं तिच्यासाठी रान 
शत्रूंचा नेहमी असतो टांगता बाण 

मुंगी कडुन आई मी बरंच काही शिकेन 
आळसाला आजच अंथरुणात सोडेन 

लहान जरी असेन मोठं मी बनेन 
खुप कष्ट करुन शाळा मी शिकेन



Wednesday, October 7, 2020

हो ! मला प्रतिभा व्हायचं आहे !


हो ! मला प्रतिभा व्हायचं आहे ! 
शतकानुशतके स्त्रीने सहन केलेला अन्याय दूर करण्यासाठी 
पुरुष प्रधान संस्कृती मध्ये स्त्रीत्वाचा ठसा उमटविण्यासाठी 
यशाच्या उंच शिखरावर पोहचून देशाचा बहुमान वाढवायचा आहे 
हो ! मला प्रतिभा व्हायचं आहे ! 

प्रत्येक स्त्रीच्या मनात नवचेतना पेटविण्यासाठी 
पुरुषांपेक्षा स्त्रिया कमी नाही हे पटवून देण्यासाठी 
साऱ्या पुरुषांची मान एकदातरी आदराने झुकवायची आहे 
हो ! मला प्रतिभा व्हायचं आहे ! 

सारी गगने कर्तुत्वाच्या शक्तीने भेदून टाकण्यासाठी, 
स्त्री-शक्ती संघटीत करून देशाला सुसंस्कृत बनविण्यासाठी, 
समाजातील प्रत्येक स्त्रीला प्रेरणा देऊन तिचा आदर्श व्हायचं आहे 
हो ! मला प्रतिभा व्हायचं आहे ! 

संवैधानिक अधिकार स्त्रियांना मिळवून देण्यासाठी 
स्त्रियांचा आत्मविश्वास, अस्मिता व हक्क जपण्यासाठी 
समाजातील अतृप्त नराधमांचा समूळ नायनाट करायचा आहे 
हो ! मला प्रतिभा व्हायचं आहे ! 

स्त्रियांच्या कला, गुणांना व कौशल्याला वाव देण्यासाठी 
सशक्त व कीर्तिवंत स्त्रीत्वाचा ठसा सर्वत्र रुजविण्यासाठी 
समाजामध्ये स्त्रियांना वंदनीय स्थान प्राप्त करून द्यायचे आहे 
हो ! मला प्रतिभा व्हायचं आहे !


Sunday, September 27, 2020

सृष्टीस दान


डरकाळी तेजस्विनीची फुटताच
बरसला मेघराज
सरी ओल्या पडताच
धरणी नटली हिरवा साज

कड्या कपारीतुनी वाहताच धारा
बहरली सरीताराणी
पाहून पिसाट वारा
वृक्षवेली हसती मनी

होताच ओलीचिंब माती
सुगंध दरवळला
पाखरे किलबिल गाती
समुद्रही खवळला

निसर्गा तुझा रंगता खेळ
जणू ठरते वरदान
बसतो फुला फळांचा मेळ
करण्या सृष्टीस दान






Recent Posts

क्या सागर, क्या किनारा।

सागर की लहरे, एक छोटे कंकड को बडी तेजी से उछल उछल कर किनारे तक ले जा रही थी। उस कंकड को बडी खुशी हुई, ये सोचकर कि मै इन लहरो के किसी काम का ...

Most Popular Posts