Search This Blog

Wednesday, May 6, 2020

तुम्हीच आहात सर्व..!


तुम्हीच आहात सर्व..!


तुमच्या सारख्या नव तरुणाई, नवं चेतन्याने बहरलेल्या सळसळत्या रक्ताने ध्येय प्राप्तीसाठी पेटून उठलेल्या माझ्या सर्व मित्र आणि मैत्रिणींसाठी मला विचार व्यक्त करण्याची संधी मिळणे हे भाग्यच.
माझ्या मते प्रत्येक व्यक्ती एखादी नवीन गोष्ट करण्यास घाबरण्यामागे त्या गोष्टीबद्दल असलेले अपूर्ण ज्ञान, माझी क्षमताच नाही असा प्राथमिक गैरसमज आणि सुरु केलेल्या गोष्टीत अपयशी होण्याची मानसिक भीती इत्यादींचा प्रामुख्याने समावेश असतो. परिणामी आपण एखादी नवीन गोष्ट सुरु करण्या आधीच तिला संपवून टाकतो. असेच आपल्या आयुष्याच्या ध्येयाबरोबर देखील आपण करीत असतो. आयुष्यात येणाऱ्या अडचणींवर मात करण्यासाठी आपण सर्वप्रथम ठरविले पाहिजे कि, मला काय साध्य करायचे? (What is my goal?) माझी क्षमता काय? (What is my Capability?), मी ती कशी वाढविणार? (How I increase it?) व ते मी कसे साध्य करणार? (How do I achieve it?) माझ्या मते सुरवातीला तेच ध्येय ठेवा, जे तुम्ही गाठण्यात सवतःला पात्र समजता. सांगायचे तात्पर्य एवढेच कि सुरवात त्याच ध्येयाची करा, त्याच गोष्टींची करा ज्या तुम्ही वेळेत साध्य करू शकता कारण वेळेनुसार गरजा, आवडी-निवडी बदलत असतात.
         समजण्यासाठी उदाहरण पाहू, समजा आज रोजी मी माझं ध्येय निश्चित केलं कि मला इंग्लिश खाडी पोहून पार करायची आहे (This is my Goal) हे ध्येय साधण्यासाठी मला इंग्लिश खाडीचे अंतर माहिती करावे लागेल, माझी पोहण्याची क्षमता बघावी लागेल, परंतु मला कळलं कि मी पोहुच शकत नाही किंवा मला पोहणे येत नाही तर ते मी कसे साध्य करणार? (How can I achieve my goal?) मग माझ्या ध्येय पूर्तीसाठी मला नक्कीच नियोजन करावे लागेल. मुख्य ध्येयाला गाठण्यासाठी उपमुख्य ध्येय (Sub Goals for Main Goals) ठरवावे लागतील. अर्थातच पोहणे शिकणे, सुरवातीला उथळ पाण्यात, हळू हळू खोल पाण्यात, व नंतर पोहण्याची क्षमता वाढविणे व त्याकरिता नियमबद्ध रोज सराव करणे आज १ तास, उद्या २ तास अशी क्षमता वाढवून वेग वाढवावा लागेल. म्हणजेइंग्लिश खाडी पोहून पार करण्याचे माझे ध्येय सुरवाती पासून ते साध्य करण्यापर्यंत मधल्यावेळेत उपमुख्य ध्येय ठरवून ते गात पुढे मुख्य ध्येयाकडे वाटचाल करावी लागेल. जेणेकरून माझे ध्येय साध्य करतांना कटिबद्ध नियोजनामुळे माझी अपयशी होण्याची टक्केवारी नक्कीच कमी होईल आणि मानसिक दडपण कमी होऊन माझे ध्येय वेळीच साध्य होईल.
परंतु हे सर्व साध्य करत असताना मला प्रत्येक क्षणात आनंद घ्यायचा आहे. ध्येय पुर्तीचा प्रवास आनंदात पूर्ण करायचा आहे. प्रत्येक गोष्ट करत असताना १००% करायची आहे. जर ध्येय साध्य झालं नाही तर समजायच कि आपण १००% दिलेच नाही आणि हे सर्व करत असताना अपयशी झालो तर हताश होण्याचे कारण नाही कारण जीवनाचं वास्तविक सत्य हे आहे की माणसाच्या आयुष्यात यशा पेक्षा अपयश जास्त महत्वाचं कारण जिकंण्याचे जास्त महत्व तोच समजू शकतो, जो हरला आहे. कारण अपयश माणसाच्या उणीवा संपवण्यात त्याला मदत करते. मी तर समजते अपयश हा माणसाचा शिक्षक आहे जर तुम्ही पुनः प्रयत्न कराल (Failure is your best teacher, if u try again for success).
आज आपण काही जगप्रसिद्ध लोकांचा विचार केला तर काही बोटावर मोजण्या इतके लोक आहेत जे सुरवातीपासून अपयशी झालेच नाहीत. परंतु अशी कितीरी नावे पहायला मिळतील जे लोक त्यांच्या ध्येयपूर्तीच्या सुरवातीला एक नाही, दोन नाही, तर अनेक वेळा अपयशी (Fail) झालेत तरी देखील ते आज त्यांच्या यशामुळे (Success) मुळे जागतिक पातळीवर प्रसिद्ध (World popular) आहेत.
आपण हेनरी फोर्डचं उदाहरण घेऊयात हेनरी फोर्ड हे बिलेनियर आणि जगप्रसिद्ध फोर्ड मोटार कंपनीचे मालक आहेत. परंतु हे यश मिळविण्या आधी हेनरी फोर्ड पाच वेगवेगळ्या व्यवसायामध्ये (In Business) अपयशी झाले होते आणि कर्जा मध्ये बुडाले होते. तरीसुद्धा ते आज एका बिलेनियर कंपनीचे मालक आहेत. अयशस्वी होण्याची गोष्ट करायची झाली तर शास्त्रज्ञ एडिसन एक नंबरवर येतील. तुम्हाला माहित आहे, एडिसन ने विजेच्या दिव्याचा  शोध लावला परंतु विजेच्या दिवा बनवण्याआधी त्याने जवळपास १००० अयशस्वी प्रयोग केले होते. अल्बर्ट आईन्स्टाईन ४ वर्षापर्यंत बोलू शकत नव्हता आणि वयाच्या ७ वर्षापर्यंत निराधार होता. लोकांनी त्याला मंदबुद्धी म्हणून चिडवायला सुरवात केली होती. परंतु तो आज आपल्या सिद्धांतामुळे जगातला सर्वात मोठा शास्त्रज्ञ बनला. थोडा विचार केला की जर, हेनरी फोर्ड पाच व्यवसायांमध्ये अपयशी झाल्यावर हताश होऊन बसला असता, एडिसन अयशस्वी प्रयोगामुळे अपेक्षाहीन झाला असता आणि आईन्स्टाईन सवतःला मतीमंद समजून चुपचाप बसला असता तर काय झालं असत? आपण सर्व यांच्या महान विचारांपासून आणि वेगवेगळ्या आविष्कारापासून वंचित राहिलो असतो.
कुठलेही कार्य करायला जेव्हा सुरवात कराल निश्चितच त्यामध्ये अनेक अडथळे येतील. मला येथे स्वामी विवेकानंदाचे विचार आठवतात ते म्हणतात कुठलेच कार्य अडथळ्याशिवाय पार पडू शकत नाही, शेवट पर्यंत जे प्रत्यन करतात, त्यांनाच यश प्राप्त होते. तुमच्या मार्गावर अडथळे आले नाहीत, तर समजा तुम्ही मार्ग चुकलात. आलेल्या अडथळ्यांना पार करत पुढे जाण्यातच यश आहे. परंतु आपण अडथळ्यातच गुंतून पडतो म्हणूनच हेनरी फोर्ड म्हणतात Most people spend more time and energy going around problems than in trying to solve them.” म्हणजे बरेच लोक समस्या सोडविण्या पेक्षा त्यामध्येच गुरफटून जास्त वेळ आणि ताकद वाया घालवितात.” बिल गेट त्यांच्या अनुभवावरून सांगतात की एखादी समस्या आल्यानंतर जुने लोक विचारतात की हे काय आहे? परंतु नवीन लोक विचारतात आपण याला कसे निपटु शकतो? हे सांगण्यामागे उद्देश एवढाच की आपण सर्व नव्या पिढीचे नवे तरुण आहात, आपणही स्वतःची नवी संज्ञा दाखवावी व एखादी समस्या आल्यानंतर हि काय आहे? (What is this) विचारण्यापेक्षा आपण याला कसे सोडवू? (How we solve it?) कारण हेच तरुणांचे लक्षण आहे.
 मला तुमच्या बरोबर एक गोष्ट नक्की शेअर करायला आवडेल कारण ती तुमच्या सर्वांसाठी फार महत्वाची आहे. आयुष्याचं म्हणजेच जिवनाचं एक गुपित (Secret) असतं ज्याला ते कळलं आणि ज्यांनी त्याचा विचार केला तो नक्कीच यशस्वी होतो. तुम्हा सर्वाना डॉ. वामनराव पै यांचे एक वाक्य आठवत असेल “तूच आहे तुझ्या जीवनाचा शिल्पकार”. माझ्या मते हे १००% सत्य आहे, कारण प्रत्येक मनुष्य स्वत:चे भविष्य घडविण्यास स्वत:च जवाबदार असतो. आता तुम्ही म्हणाल नाही, आम्ही करू शकलो असतो पण आमची आर्थिक परिस्थिती वाईट होती, कोणी म्हणेल मला काय करायचं हे कोणी सांगितलच नाही. तर कोणी म्हणेल माझ्याकडे वेळच नव्हता. असे अनेक करणे दाखवून आपण स्वत:ला, नशिबाला, इतरांना, परिस्थितीला दोष देतो व आपल्या कर्मावर पडदा टाकून सहानुभूती मिळवितो. परंतु, परिस्थितीचा विचार तुमच्या आमच्या सारखे डॉ. अब्दुल कलाम करत बसले असते तर मिसाईल मेन (Misile Man) आपण त्यांना म्हटलं नसतं. अयशस्वी माणसे झोपेत स्वप्न बघतात व जागे झाले कि विसरतात परंतु डॉ. कलामांना त्यांची स्वप्ने झोपूच देत नव्हती. यशस्वी आणि अयशस्वी माणसांमध्ये एकाच गोष्टींचा फरक असतो तो म्हणजे विचार (Thoughts) म्हणूनच Always think positive and  Always think big. परंतु चांगले विचार तेव्हाच येतील, जेव्हा आपण चांगल्या वातावरणात, चांगल्या संगतीत, चांगल्या माणसात राहू, चांगले ऐकू, चांगले वाचू आणि चांगले बघू म्हणून नेहमी प्रयत्न करायचा कि जी माणसे आपल्याला निरुत्साही (Demotivate) करतात त्यांच्या पासून सदैव दूर राहण्याचा. जी गोष्ट आपल्याला आपल्या ध्येयापासून दूर नेण्यास परावृत्त करेल त्यापासून दूर राहण्याचा.
उठा जागे व्हा आणि तोपर्यंत थांबू नका जोपर्यंत ध्येयप्राप्ती होत नाही तुम्हाला चंद्रगुप्त मौर्य आणि चाणक्य माहितीच असतील. चंद्रगुप्त म्हणतात "किस्मत पहले हि लिखी जा चुकी हे, तो कोशिश करणेसे क्या मिलेगा." त्यावर चाणक्य म्हणतात "क्या पता किस्मत मे लिखा हो, की कोशिश करणे से हि मिलेगा." चाणक्याचे हे वाक्य आपल्याला खूप काही शिकवून म्हणून जी महान व्यक्तिमत्वे होऊन गेलीत त्यांचे विचार आपण नक्कीच वाचले पाहिजेत. कारण त्या विचार शक्तीच्या जोरावर हि सामान्य माणसे इतिहासात असामान्य होऊन अजरामर झालीत.
आपण आज स्वत:ची आणि इतरांची वर्तमान स्थिती काय आहे यावरून स्वत:च्या किंवा इतरांच्या भविष्याचा अंदाज घेत बसण्यापेक्षा काळाप्रमाणे कर्म करत राहावे. कारण काळ अशी शक्ती आहे जी कोळश्याच्या तुकड्याला हिरा बनवू शकते. म्हणून स्वत:ला कधी कमी लेखू नका. तुम्ही अनंत आत्मा आहात, ज्यासाठी काहीच अशक्य नाही. सर्व शक्ती आपल्या मध्येच आहेत. आपण फक्त त्या ओळखून स्वत:ला पारखण्याची गरज आहे, म्हणजे तुमचे मोल जगाला कळेल.
कधीकाळी मला एखादी गोष्ट येत नव्हती म्हणजे आजही येणार नाही आणि प्रयत्न न करताच ती गोष्ट सोडून देणे मूर्खपणाचे ठरेल कारण माणसाच्या क्षमता ह्या वेळेनुसार वाढत जातात. यासाठी मला एक गोष्ट सांगायला नक्कीच आवडेल हत्तीचे पिल्लू लहान असते तेव्हा कमजोर असते. तेव्हा त्याला दोरीने बांधून ठेवतात. तो दोरी तोडण्याचा खूप प्रयत्न करतो परंतु दोरी तुटत नाही. कालांतराने हत्ती मोठा होतो. परंतु तो दोरी तोडण्याचा प्रयत्न करीत नाही. कारण त्याने त्याचा डोक्यात पक्के बिंबवले असते कि हि दोरी आपण तोडूच शकत नाही. परंतु त्याला तो आज किती मोठा आहे किंवा जगातल्या बलवान प्राण्यांपैकी एक आहे याची जाणीव नसते. त्याच्या थोड्याश्या प्रयत्नातही दोरी आरामात तुटू शकली असती, परंतु तो प्रयत्नच करत नाही. हत्तीसारखे आपल्याही बाबतीत होऊ नये यासाठी आपण प्रत्येक वेळेस प्रयत्न केलेच पाहिजे कोणाला माहित तोच प्रयत्न आपल्याला अपयशापासून मुक्त करेल व याश्याच्या उच्च शिखरावर घेऊन जाईल. म्हणून लक्षात ठेवा कोई भी लक्ष्य बडा नही, जिता वही जो डरा नही”.
*****


काय देणार आम्ही आमच्या नवीन पिढीला..?


काय देणार आम्ही आमच्या नवीन पिढीला..?

काय देणार आम्ही आमच्या नवीन पिढीला? हा प्रश्न आमच्या प्रत्येक पाल्याच्या पालकांना भेडसवायलाचं हवा. कारण का तर सांगते ऐका माझ्या सर्व बंधू-भगिनींनो, काका-काकुंनो, आजी-आजोबांनो, नाना-नानिनो, शेजाऱ्या-पाजाऱ्यांनो, सर्व Whats App Ggroups वाल्यांनो, सर्व राजकारण्यांनो  आणि समाजकारण्यांनो व उरलेल्या खाजगी-शासकीय कर्मचारी मित्रांनो आणि सर्व News Channal वाल्यानो.

मला सांगा, कुठे निघालो आहोत आपण हे सर्व जातिपंथांचे धर्मांध शक्तीचे लठ्ठ ओझे घेऊन. काही ध्येय आहे का आपण सर्वांचं ? असेल तर मला ही कळू द्या. आपल्या सर्वांच्या पाल्याच्या स्वरूपात ही जी सर्व नवीन फुले उगवली आहेत, त्यांची कशी निगराणी करतो आहोत आपण, एक जबाबदार भारत देशाचा नागरिक म्हणून कसे घडवत आहोत आपण या शिशु भारताला. केला का विचार, नाही ना ? मग करा ! T.V. Channals, वृत्त पत्रे, Whats App गृप, फेस बुक, होर्डींग्ज, रोड, शहर, गल्ली, घर सर्व स्थळे ही जातीपातीच्या खेळात गुरफटलेली आहेत आणि उरलेली जागा व्यापारी मंडळींनी त्यांचा व्यापार वाढवण्यात व त्यासाठी प्रत्येक ठिकाणी  मोठ मोठे शॉपिंग मॉल्स व दुकाने उभारण्यात व्यापून टाकली आहे. हे हि करा, काही हरकत नाही. पण कोणालाच असे वाटत नाही की प्रत्येक क्षेत्र, विभाग, परिसर निहाय काही सायन्स सेंटर निर्माण करावे ? मुंबई  सारख्या महानगरात तुरळक २-३ ठिकाणी नेहरू सायन्स केंद्रा सारखे सायन्स सेंटर सोडले तर लहान मुलांवर आधुनिक विज्ञानाचे सुसंस्कार घडावेत, त्यांची जडण घडण मुळात विज्ञानाच्या भक्कम पायावर उभी करावी असे प्रयत्न कोठेही होतांना दिसत नाहीत. 

या लहानग्यांचे डोके सध्या रिकामे आहेत. कशाला त्यात जातीपाती धर्माचे, आरक्षणाचे व आंदोलनाचे म्हणजे रस्त्यावर उतरून मोटारी जाळणे, दगड फेक करणे, असली कटू बीजे  रुजवत आहात. बस झाले या जातीपातींच्या जाळ्यात अडकणे. कंटाळा येतो तेच तेच यॆकून आणि बघुन. मुलांवर सुसंस्कार होण्यासाठी पालक, घर, शाळा आणि समाज कारणीभूत असतो. मुले जे बघतात, जे यॆकतात आणि मोठी मंडळी जे करते तेच बघून अनुकरण करीत असतात. सुट्टीच्या दिवसात मॉल्समध्ये जाणे शोपिंग्स करणे, डॉमिनोज मध्ये जाऊन पिज्जा खाणे हे सर्व चालणारच. पण मुलांच्या बुद्धिला ने गळी चालना देण्यासाठी काय करतो आहोत आपण सर्व. मला सांगा ज्या जमिनीवर पाय रोवून आरक्षण मागतो, जातपात करत सुसाट सुटतो, ती किती दिवस पाया खाली असेल याची कल्पना तरी आहे का कुणाला. तुमच्या माझ्या सारख्या सामान्य लोकांना निसर्गाचे सूत्र कळणं कठीणच. मग म्हणून काय नवीन पिढीला आपल्यासारखे अंधारात ठेवायची, आपली बुद्धी जकडली गोठली जातीपातीमध्ये, म्हणून काय मुलांच्या विचारांची गती कमी करण्याचा विचार आहे की काय ? नाही ना ! मग जागे व्हा ! सकाळ नाही, संध्याकाळचा सूर्य आहे तो ! सारं जग मागून पुढे सरसावत आहे. नवनवीन तंत्रज्ञान नवनवीन शोध मोहीम यामध्ये त्यांनी त्यांच्या नवीन पिढीला बसवलं आहे. आज लहान मुलांसाठी योग्य आणि माहितीपूर्ण सुसज्य मंच केव्हाच तयार आहे. त्याचा २१ व्या शतकात महत्वाचा रोल असून जगाशी संपूर्ण जवळीक असूनही जग किती पुढे जात आहे हे कळूनही न कळण्यागत आपण वागने बरे नाही. फक्त इंग्रजी शाळेमध्ये टाकून इंग्रजी खाडखाड बोलून किंवा जीन्स टी-शर्ट घालून आपण आधुनिक झालो असं नाही, त्यासाठी आपल्याला मुळापासून तयारी करावी लागते. आपल्या पाल्याच्या बुद्धीला आणि विचाराना वैज्ञानिक दृष्टीकोन देण्यासाठी कुठले प्रयत्न आपण करू शकतो, समाजामध्ये काय परिवर्तन घडवू शकतो, याचा विचार करण्यासाठी एकदा तरी सर्व एकत्र या ! जातीनिहाय निघणाऱ्या मोर्चांची संख्या लाखोंच्या घरात आहे,  सांगण्या पेक्षा वैज्ञानिक दृष्टीकोन करोडोंच्या मनात कसा रुजेल याचा प्रचार व प्रसार करा ! कारण, आज आपल्या देशाला कुठल्याही आधुनिक शस्त्रांस्त्रांसाठी असो, कुठल्या नवीनतम तंत्रज्ञानासाठी असो वा कुठल्या प्रगत धोरणासाठी असो इतर देशांवर अवलंबून राहावं लागतं. भरगच्च लोकसंख्येच्या या देशात कुशाग्र पाच पन्नास वैज्ञानिक घडू नयेत, वर्षाला ४-५ कोणतेही नाविन्यपूर्ण शोध लागू नये हे नवलच. कधी रशियाचं तंत्रज्ञान तर कधी अमेरिकेचं, फ्रान्सचं अरे आपण काय करतो ? आपल्या मुलांमध्ये पण आहेत कुशाग्र भावी वैज्ञानिक. फक्त ते घडविण्यासाठी व  जोपासण्यासाठी योग्य वेळेला योग्य खतपाणी घालण्याची गरज आहे. उठा सर्व जवाबदार नागरिकांनो बघा फुल कोमजण्या आधी जपा त्याला आणि येउद्या भावी आधुनिक भारताचे गोड फळे, म्हणजे परावलंबी वृत्तीतून बाहेर पडून भारत देखील स्वावलंबी बनेल. आपल्या पुरोगामी समाजसेवकांनी व स्वातंत्र्य सैनिकांनी आपल्याला स्वावलंबन शिकवलं. चला स्थापन करूया भारत स्वावलंबन मिशन, करूया नवीन तंत्रज्ञान निर्माण, लावूया नाविन्यपूर्ण शोध व त्या करिता उभे करूया ठीक ठिकाणी विज्ञान सेंटर आणि घडूद्या उद्याचे चंद्रशेखर, रमन, कलाम. कळूद्या जगाला हा देश फक्त साप सपेऱ्यांचाच नसून विज्ञानाचा देश देखील आहे.

- राणी अमोल मोरे 
***तरुणांनी राजकारणात कशासाठी यावे...???

तरुणांनी राजकारणात कशासाठी यावे...???


      गामध्ये दुसर्‍या क्रमांकावरील सर्वाधिक लोकसंख्या व सर्वाधिक लोकसंखेमध्ये भन्नाट अशी तरुणांची संख्या म्हणून नावारूपाला आलेला आपला “सारे जंहासे अच्छा, हिंदुस्ता हमारा, म्हणजेच भारत देश. अशा या बलाढ्य भारत देशामध्ये दोन महत्वाच्या गोष्टी त्या म्हणजे तरुण आणि राजकारण. या दोन्हीही गोष्टींकडे आपले दुर्लक्ष होत असल्याने देशाचा विकास दिवसेंदिवस मंदावत आहे. ज्या देशामध्ये तरुणांची संख्या जास्त असेल तर त्यांचे प्रश्न, गरजा, हक्क, कर्तव्य, शक्ति आणि सहभाग देखील तितकाच जास्त. परंतु, असे असुन सुद्धा आपल्या भारत देशामध्ये असे होताना दिसत नाही, कारण येथील तरुणाला या सर्व गोष्टींवर विचार करायला वेळ नाही, रुचि नाही तसेच, त्याला या सर्व गोष्टींचे गूढ म्हणजे फक्त राजकीय सत्ता हे अजून उमगलेलेच नाही. मग असे असुनदेखील तरुण राजकारणात का येत नाहीत..? या गोष्टीवर कोणी प्रकाश का टाकला नसावा..? तर यावर उत्तर मिळेल की तरुणांना राजकारणात रस नाही किंवा तरुणांना राजकारण सांभाळताचं येत नाही आणि जर ही उत्तरे खरी असतील तर याला दोषी कोण..? राजकारणात तरुणांची संख्या रोडवते आहे याला कोण जवाबदार..? येथील तरूनच की देशाचे वृद्धावस्थेतील राजकारण..? मी तर म्हणेल दोन्हीही..! राजकारण यासाठी की, आपल्या देशाचे राजकारण हे एखाद्या सणासारखे पारंपारिक आहे. ज्याप्रकारे आपण सण साजरे करत होतो आणि आताही करत आहोत त्याचप्रकारे, आपल्या देशाचे राजकारण परंपरागत घराणेशाहीने, वारसाहक्काने सुरू आहे आणि तरुण यासाठी की त्यांना राजकारणात का व कशासाठी यावे हेच स्पष्ट झालेले नाही. परिणामी, बोटांवर मोजण्याइतके काही तरुण राजकारणात असुनदेखील त्यांचे ध्येये व उद्दिष्टे अंधकारमयचं.

      मग आपल्याला प्रश्न पडतो तरुणांनी राजकारणात कशासाठी यावे..? र्वप्रथम तरुणांनाची व्याख्या करूया. तरुण म्हटलं की काही ओळी आठवतात.
या उसळत्या रक्तात माझ्या,
ज्वालामूखीचा दाह दे !
वादळाची दे गती,
पण भान ध्येयाचे असू दे !!
      अशाच तरुणांनी राजकारणात यावं, जे आपल्या उसळत्या आणि सळसळत्या रक्ताने देशहितासाठी कार्य करतील, त्या कार्याचे पडसाद ज्व्यालामुखीच्या लाव्याप्रमाणे उमटवतील. वादळाच्या गतीने समोर जात राहतील आणि हे सर्व करतांना ध्येयाचे भान मात्र नेहमी असू देतील.

      कमीत कमी वेळात जर देशाला विकसित राष्ट्र बनवायचे असेल तर तरुण पिढीला राजकारणाकडे वळावेच लागेल. कारण, कमी वेळात अधिक कार्य अचूकपणे पूर्ण करण्याची क्षमता फक्त तरुणांमध्येच आहे. देशाला नवनवीन विचार, संकल्पना, उद्दिष्टांची गरज आहे आणि ते फक्त तरूनच देऊ शकतात. आजचे तरुण शिक्षणाने व तंत्रज्ञानाने सज्य असुन ते जर देशाला राजकारणी म्हणून मिळाले तर देशाचे संपूर्ण राजकारण हे सूशिक्षीत ध्येयनिष्ट होइल. तरुणांचे विचार जुन्या कल्पनांनी बुरसटलेले नसतात तर ते नवनवीन संकल्पनांनी सजलेले तेजोमय असतात. एकदा का तरुणांचा विकास झाला की देशाचा विकास झाला म्हणून समजा, पण हे तेव्हाच शक्य आहे जेव्हा आपण त्यांचे प्रश्न सोडवू व त्यांना समजू शकू आणि त्यांच्यावर विश्वास ठेवू. देशाच्या विकासात अडथळा निर्माण करणार्‍या संपूर्ण गोष्टी आपण संपून टाकु उदा. पारंपरिक व पिढ्यांपिढ्या वारसहक्काने चालू असणारे राजकारण. त्यानंतर, राजकारणात व देशात होणारा भ्रष्टाचार मुळासकट उपटून काढू. सामाजिक विषमतेची जी दरी निर्माण झाली आहे, तीला भरून टाकू. जातिवाद, धर्मभेद, अंधश्रद्धा यांचा विनाश करू. एवढेच नव्हे तर देशाचे शिक्षण, आरोग्य, लोकांची आर्थिक स्थिति, गरीबी कशी सुधारेल याकडे लक्ष देऊ. नवनवीन योजना राबवून तंत्रज्ञानाचा उपयोग करून विकास करू.

      राजकारणात तरुणांनी राष्ट्रासाठी पॉलिटिक्स, पॉवर आणि बिजनेस (पि.पि.बी. फॉर आर.) हा एकमेव उद्देश जरी साध्य केला तर देश प्रगत झाला म्हणून समजा. सपूर्ण देशहितासाठी, समाजासाठी तरुणांनी राजकारण करावं, लोकप्रियता मिळवावी, अनेक तरुणांना राजकरणाकडे परावृत्त करावे, त्यांच्यामध्ये देशप्रेम व सामाजिक जाणीव निर्माण करावी, त्यांना विकासक वं उद्योजक दृष्टी द्यावी जेणेकरून देशाचे खर्‍या अर्थाने हित साध्य होईल. पि.पि.बी. फॉर आर. हे सूत्र घेऊन तरुणाने राजकरणामध्ये पदार्पण केले तर स्वप्नातला भारत बनणे सहज शक्य होईल. माझ्यामते देशाच्या राजकरणाला वृद्धपणाने ग्रासलेले आहे, त्याला कमजोरी आली आहे त्यामुळे देशाच्या विकासाला सुधा वृद्धपण प्राप्त झाले आहे अशा वृद्ध राजकरणाला बादलायचे असेल तर तरुणाईच ओषध द्याव लागेल. म्हणजे, हे राजकारण आपली जुनी कात टाकून परत नव्या जोमाने प्रगती पथावर धावत सुटेल.

      देशातील कुठल्याही क्षेत्रात, कुठल्याही योजनेत, कामात किंवा आणखी कोणत्याही गोष्टीत बदल घडवायचा असेल तर सत्ता सोबत असणे फार महत्वाचे आहे आणि ते फक्त राजकारणात राहूनच करता येईल. स्त्री-पुरुष समानता या गोष्टीकडे बघण्याची आजच्या तरुणाची मानसिकता फार प्रबळ असुन आपल्या राजकारणात तिचा प्रामुख्याने अंतर्भाव करणे त्यांना सहज शक्य होऊ शकते. आजच्या तरुण वर्गाला बर्‍याच गोष्टींची चीड येते पण ते बाहेरून ओरडन्याखेरीज दुसरं काहीही करू शकत नाहीत. म्हणून अशा तापलेल्या, गरम रक्ताला एकदा राजकारणात उतरवून बघा म्हणजे बर्फाच्या खड्यासारखा गोठून बसलेला हा भारत देश सळसळत्या नदीसारखा वाहायला लागला नाही तरच नवल.

      जर, आपण एखाद्या वृद्ध राजकारण्याला वीचारले की तरुण आहेत का राजकारणात..? तर त्यांच ठामपणे उत्तर असेल आहेत. ठीक आहे, असतीलही. परंतु, त्यांचा उपयोग खरच विकासक बुद्धीने होत आहे का..? त्यांच्या कल्पनांना, वैचारिक बुद्धीला, विकासक दृष्टीला खरचं न्याय मिळत आहे का..? फक्त, त्यांचा आपल्या स्वार्थापोटी गैरफायदा घेतला जात आहे का, हे तपासण्याची गरज मला मनापासून वाटत आहे. कारण, आज राजकारणात तरुणांचा फक्त सत्ता टिकवण्यासाठी, बड्या राजकारण्यांचे राडे सांभाळण्यासाठी, वेळप्रसंगी आपल्या सोयीनुरूप हाताळण्यासाठी फार चतुराइणे उपयोग घेतला जात आहे. तसेच, या सर्व गोष्टीला बळी न पडता एखादा तरुण आपल्या कार्यकर्तुत्वाने विकासक व समाजिक राजकारण करत असल्यास त्याची चोहीकडून गळचेपी करण्याचं काम देखील तितक्याच बारकाईने केलं जातं. जेणेकरून, तो सुद्धा त्यांच्याचपैकीच एक होण्यास भाग पडतो.

      आपण नेहमी म्हणतो की देशाला आपले घर समजल पाहिजे, तेथे राहणारे सारे भारतीय हे आपले बांधव आहेत, मग याच देशात सामाजिक व आर्थिक दरी का..? कशासाठी..? कोणी निर्माण केली..? कोणासाठी..? तर उत्तर मिळेल वृद्ध राजकीय पुढारी किंवा परंपरागत राजकारणी. ज्याप्रमाणे घरातील लहान मुले शिक्षण घेऊन परिपूर्ण होतात मग अशा मुलांना आई-वडील घरातील सर्व अधिकार देऊन त्यांच्या खांद्यावर घराची धुरा देऊन मोकळे होतात. कारण, त्यांना माहीत असते की, आपल्याकडे आता ती ताकत उरलेली नाही किंवा ज्या नवीन कल्पनांची, गोष्टींची घराला गरज आहे ती आपल्या मुलामध्ये आहे व ते सपूर्ण घर उत्तमरित्या सांभाळू शकतात.  त्याचप्रमाणे, देशाचे तरुण हे या देशाची मुले आहेत मग त्यांनाही आपल्या घरासारखी संपूर्ण देशाची धुरा आपल्या खांद्यावर घेण्यास या वृद्ध राजकारणी मंडळीने प्रोत्साहित करावे व स्वत: सक्रिय राजकारणातून निवृत्त व्हावे, तरुणांना त्यांच्या जवाबदारीची जाणीव करून द्यावी आणि तरूणांनी देखील तितक्याच आत्मविश्वासाणे देशाची धुरा सांभाळण्यास सज्ज व्हावे. असे झाल्यास खर्‍या अर्थाने राज्य, राजकारण व देश यांचा समतोल साधून सामाजिक, संस्कृतिक, शैक्षणिक व आर्थिक विकाहोईल.

      राष्ट्राचा सर्व कारभार ज्या क्षेत्रातून चालतो ते हे राजकारण सध्यस्थितीत फार मलीहोत चाललेलं आहे. कारण, आजच्या राजकारण्यांचा उद्देश फक्त पैसा, सत्ता, प्रशस्ती मिळवणे आणि विरोधकांवर कुरघोडी करून स्वत:ला श्रेष्ठ ठरविणे इतकाच उरलेला आहे. म्हणून, तरुणांनी या सर्व गोष्टींचा कटाक्षाने परित्याग करून, सामाजिक बांधिलकी जोपासून, गैरमार्गे सत्ता व पैसा यांच्या विरुद्ध बंड पुकारून, उद्योजक व विकासक भूमिका स्वीकारून, जनसामान्यांच्या हिताचे प्रण घेऊन, राजकरणाला विकासचं मध्यम समजून, नवजात बाळासारखी निस्वार्थी वृत्ती ठेवून, सकारात्मक दृष्टीकोणाने राजकारणात यावे. जेणेकरून, ज्या सर्वांगीण विकासाचे स्वप्न सामान्य माणूस बघतो आहे ते साध्य होईल व राजकारणात तरुणांचा वाटा खर्‍या अर्थाने स्पष्ट होईल.

- राणी अमोल मोरे
*******x

Recent Posts

पर्यावर्णिय बदल, मानसाच्या जाती आणि आरक्षणे

सध्या परिस्थितीचा विचार लक्षात घेता असे दिसून येते की मानसाला भविष्यामध्ये स्वत:ला माणूस म्हणून टिकून राहण्यापेक्षा स्वत:च्या जाती धर्मांची ...

Most Popular Posts