काहींना महिला हा विषय मुळात गंमतीशीर वाटत असेल तर कृपया मला माफ करा. कारण माझ्याकडून अशा अपेक्षा केल्या जातात की तुम्ही महीला या विषयावर काही गंमतीशीर लिहा कारण त्यांचा वाचक वर्ग अधिक आहे. महिला ह्या काय सोशल मिडीयाच्या कारखाण्यातील हास्यांचे चुटकुले बनविण्यासाठीचे रॉ-मटेरियल आहेत, की त्या फक्त गंमत जंमत म्हणून वाचायचा, हसायचा आणि डिवचून विसरुन जायचा विषय झाल्यात.
भारता सारख्या समृद्ध आध्यात्मिक आणि पुरातण संस्कृतीमध्ये महिला किंवा स्त्रीया हा उच्च कोटीचा पुजणीय विषय आहेत, विषयचं नाही तर उच्च कोटीच्या जीवनाचा अविभाज्य घटक आहेत. या देशात स्त्रियांची संवेदना, त्यांचा आदर त्यांची कल्पकता, कलात्मकता आणि त्याचं स्त्रीत्व म्हणजेच स्त्रीगुन यावर संशोधन, विचार मंथन होण्या इतपत वाव असतांना देखील, तो कोठून बरे गंमतीचा विषय झाला आणि या प्रगल्भ समाजाने त्याचा स्वीकारही कसा काय केला आणि खासकरून स्त्रीजातीने आपल्यावर होणा-या या हास्याच्या प्रयोगाला विरोध न करता त्याला तसेच चालू ठेवण्यास वाव का बरं दिला याचंच नवल मानावं लागेल.
(स्त्री फक्त भोग्य आहे.)
कधी पुरातण काळी स्वत:ला ज्ञानी पंडीत म्हणवणा-या महंतानी सांगीतले होते की मुळात स्त्रीकडे चेतना, आत्मा वगैरे काही नसते, ती फक्त पुरुषांकडेच असते, म्हणून जशी पुरुषाला आध्यात्माच्या मार्गावर गेल्यावर मुक्ती मीळते तशी स्त्रीला मीळत नाही. स्त्री फक्त भोग्य आहे. मग मला या महंताना विचारायचे आहे. ती आदिशक्ती महाकाली कोण होती जिने दानवांचा शिरच्छेद करुन रक्त प्राशन केले, ज्या दानवांनी तीला भोग्य समजले, तीला कमी लेखले, त्याचं काय झालं हे आपण मोठया अभिमानाने सांगत फिरतो.
नंतरच्या काळामध्ये स्त्रीवर जो अत्याचार झाला, तीला गुलामगिरीच्या सक्त बेडयामध्ये डांबवलं गेलं ते तर अविश्वसनीय आहे. या गुलामगीरीच्या खुना इतक्या खोलवर रुजल्या की जणू स्त्रीच्या जनुकावर त्याची कोडिंग होऊन त्या पिढ्यान पिढ्या सतत स्त्रीमध्ये उतरत गेल्या. ती मुक्त झाल्यानंतरही तीच्या मनावर स्त्री ही फक्त भोगाची वस्तू आहे असा प्रभाव झाला. तो प्रभाव आजही कायम दिसतो, फरक फक्त एवढाच की तेव्हा तीला हे सांगाव लागलं आणि आता मात्र ती तो विचार घेऊनच जन्माला येते. आपण नेहमी म्हणतो की इंग्रजांनी आपल्यावर राज्य केलं आणि आपल्याला त्यांची गुलामी बळजबरीने स्वीकारावी लागली. परंतू स्वातंत्र्यानंतरही आजच्या समाजात असं दिसुन येते की इंग्रज भौतीक दृष्टया येथून गेले असले तरी मानसीक दृष्टया ते आपल्यामध्ये आजही टिकून आहेत. आताची ही पाश्चात्य गुलामी भारतीयांनी स्वत: स्वीकारली आहे. त्यांना स्वत:ची संस्कृती व भाषा पाश्चात्य देशांपेक्षा हीन वाटते.
(तीने काहीशी गुलामी स्वत:च स्वीकारली आहे.)
तसंच काहीसं स्त्रीच झालं आहे. आजच्या समाजात स्त्री शिक्षीत व मुक्त असुनही तीने काहीशी गुलामी स्वत:च स्वीकारली आहे. उदाहरणासहीत स्पष्टीकरण दयायचं झालं तर जेव्हा ती स्वत:ला आरश्यात बघते, तेव्हा ती स्वत:ला स्वत:च्या दृष्टीने न बघता पुरुषांच्या दृष्टीने बघते, म्हणजे एखाद्या पुरुषाने तिच्याकडे बघीतल्यानंतर त्याला काय आवडेल त्या अनुषंगाने तिचा श्रृंगार अधिक झुकलेला असतो आणि तसच काहीसं वागणं देखील अंगीकृत केललं असतं. ब-याच वेळेला एखादा पोषाख तिच्या प्रकृतीसाठी व्यवस्थीत किंवा कम्फर्टेबल नसतो आणि तीच्या सहजतेसाठी देखील अडचणीचा असतो, तरीसुध्दा तो फॅशन च्या नावाखाली परीधान केला जातो.
भगिनींनो विसरू नका तुम्ही स्वत:मध्येच अद्भूत आहात, सर्वस्व आहात !
भगीनिंनो तुम्ही कारखाण्यातुन तयार झालेलं प्रोडक्ट आहात का? की शोभेच्या वस्तू आहात? ज्याला विकत घेणा-यांच्या किंवा बघणाऱ्यांच्या हीशोबाने पॅकेजींग किंवा नटण्याची गरज पडते. ते करा जे स्व:ताला सहज, सरळ आणि उपयोगी आहे. विसरू नका तुम्ही स्वत:मध्येच अद्भूत आहात. तुम्हीच आहात सर्व आणि ते सर्वस्व तुम्ही स्वतःमधूनच उत्पन्न करू शकता बाहेर शोधण्याची गरज तरी काय? स्वत:च्या विचारांच्या गहनतेमध्ये उतरुन स्वत:ला फुलवत चला, दुस-यांच्या आवडी नीवडीचा विचार फूलवण्यापेक्षा स्वत:च्या मनाचा विचार करा. इतरांना डोक्यावर घेण्याची गरज तरी काय ?
(स्त्री-पुरुषांची विवीधता या जगण्याला आणखी सुशोभीत बनवते)
स्वत:ला कमी किंवा जास्तही न लेखता, जे गूण तुमच्याकडे आहेत त्यांच्या तळाशी जाऊन स्वत:च्या व्यक्तीमत्वाचा विकास करा. काय गरज आहे तुम्हाला कोणाच्या बरोबरीत किंवा अधिपत्याखाली जगण्याची तुमचं जगणंच मुळात वेगळ आहे, ते तुम्ही तुमच्या पद्धतीने पुर्ण जगा. जगतांना विविधतेची गरज असते बागेमध्ये वेगवेगळी फुले वेगवेगळया रंगाची गंधांची अधिक शोभून दिसतात. तसंच हे जग एक बगीचा आहे, ज्यामध्ये स्त्री-पुरुषांची विवीधता या जगण्याला आणखी सुशोभीत बनवते, फुलवते. स्त्री फक्त स्त्रीच होऊ शकते तीला पुरुष बनण्याची गरजच नाही?
तुम्ही जगत आहात, मोकळा श्वास घेण्यासाठी, आजवर मोकळा श्वासही खुप घेतला, आता भरपूर मनसोक्त श्वास घेण्याची वेळ आली आहे. सोबतच एका नवीन विश्वात प्रवेश करण्याची कारण “तुच सृजन, तुच नवनिर्माण, तुच अंत, तुच अनंत”.
(दुस-याला भरवण्याआधी स्वत:ला भरवून सक्षम कर)
दुस-या जीवाला जन्म देण्याआधी तू हा विचार कर तू जशी जन्माला आणल्या गेली आहेस तो तुझा जन्म तुला मान्य आहे का ? नसेल तर मग आधी स्वत:ला नविन जन्म दे. दुस-याला भरवण्याआधी स्वत:ला भरवून सक्षम कर. तू कोमलतेच्या उपमेखाली अबला कमजोर बनू नकोस. कारण एक जिवंत स्त्रीच एका जीवंत जीवाला जन्म देऊ शकते. मृतक विचाराने जन्म दिलेले जीव मृतकच जन्माला येतील, मृतकच जगतील आणि मरण्याचा तर वीषयच नाही ते जन्मालाच मृतक आलेले असतिल.
या मनुष्य जातीला नष्ट करण्याची ताकद जेवढी नैसर्गिक आपत्तीमध्ये आहे, तेवढी ताकद स्त्रीमध्ये देखील आहे. कारण तीने जन्म दयायचा का नाही हे जर ठरवलं तर ही मनुष्यता लवकरचं संपुष्टात येईल. सद्यास्थितीत जापान देशात हेच होतय, तेथील स्त्रीया लग्न आणि मूल यापासुन स्व:ताला दुर ठेवत आहेत परिणामत: जापानची लोकसंख्या झपाट्याने कमी होत आहे. हे जगातील सर्व देशाबरोबर होण्याची शक्यता आहे.
यावरुन आपल्याला लक्षात आलंच असेल की स्त्री हा गहनतेचा वीषय आहे. अस्तित्वाचा विषय आहे. गंमतीचा किंवा सहज चर्चेचा विषय नाही. जय हिंद, जय भारत!
-रानमोती-
(राणी अमोल मोरे)
कवियत्री, लेखिका, कृषितज्ञ
अतिशय मार्मिक लेख.. #महिलासशक्तीकरण
ReplyDeleteअप्रतिम लेख आणि विचारधारा🙏🏻
ReplyDeleteएकदम बरोबर आहे. हे प्रत्येक स्त्रीने समजून घेणे आवश्यक आहे. 👍
ReplyDeleteसुंदर व खूप महत्त्वपूर्ण लेख.👌
ReplyDelete