Search This Blog

Monday, June 1, 2020

सख्या, सोबती निसर्गा..


सख्या, सोबती निसर्गा


हे काळजी वाहू निसर्गा ! तुझ्या धरतीच्या गर्भात जो तप्त ज्वाला उचंबून बाहेर येऊ पाहतो, त्याही पेक्षा अनंत वेदना आणि माझे दु: माझ्या अंतरमनातुन बाहेर येऊ पाहतायेत. हे सख्या निसर्गा, कोणी नाही ज्याकडे वेदना व्यक्त कराव्यात. अनंत जीव तुझ्या या धरतीवरचे विनाकामाचे माझ्या. हे सवंगडया निसर्गा, लाव्याने जमीनीला जोराने धक्का मारावा तशा वेदना मनातुन शरीराला धडकत आहेत. मनाचे पाणी तर त्यांनी केव्हाच केले, शरीरही दुभंगण्याच्या परीस्थीतीत आहे. या शरीराचा भुकंप कधी होईल सांगता येत नाही. फक्त दु:ख यागोष्टीचे आहे, तु जी मेहनत घेतली मला घडवायला, माझी कलाकृती साकारायला, त्याचं मात्र माती मोल होणार. काय विचार केला असेल ना तु मला घडवताना, की तुझ्या या सुंदर सृष्टीमध्ये मी एक फुलपाखरासारखे आयुष्य व्यतीत करावे. मला माहीत आहे तुलाही वेदना होत असतील माझी परिस्थिती पाहुन. शेवटी तुच खरा मित्र नाहीतर आयुष्यात काही लोक येतात अन मित्र, सखा, सोबती मी तुझा बनेल म्हणून बसतात, अन प्रत्येक्षात मात्र शत्रुपेक्षाही अस‍हय्य दु:खं देऊन जातात. अशा लोकांना तु बनवलेच कशाला ? ज्यांनी दुसऱ्यांच्या आनंदाचा जणू बाजार मांडला. माझ्या आयुष्यात अश्याच व्यक्ती आल्यात, आज ज्या मला शनीच्या साडेसाती सारख्या छळत आहे. येवढेच नाही निसर्गा तर त्यांचे रक्तबंध माझ्या राशीमध्ये राहु केतु सारखे फीरत आहेत.
हे वनराईच्या स्वामी, मला तुझी अगाद शक्ती देऊन जा. मला नको आहे असले जगणे. ज्यात श्वास घेतांनाही वेदणांचा पूर वाहतो. तु तुझ्या त्या सुदंर आनंदात मला विलीन करुन पुसुन टाक सर्व दु:खं, सर्व वेदना आणि पळवून लाव हे राहु-केतू. नष्ट कर तु त्यांना तुझ्या अगाध शक्तींनी. हे निसर्गा, बन माझा खरा सांगती माझे सारे दु:ख पीऊन टाक. येऊ दे सु:खाचे वारे, येऊ दे आनंद, ओसंडुन वाहु दे समाधानाचे झरे, मन भरुन टाक प्रीतीने तुझ्या. होशील का तु माझ्या आठवणीतला प्रेम जीव्हाळा, प्रीतीच्या भक्तीने तुझ्या विसरु दे माझे जगने. जे जगले आजवर मी त्यास नवी दिशा दे, नवी उमेद दे, दे पंख नवे उडण्या मनसोक्त विहारी. हे निसर्गा बुद्धा पीऊन टाक ‍चिंता माझी, पुर्ण कअर्जी माझी, हीच असे विनवनी तुला. मला ना कळे किती आयुष्य माझे. जे होते ते फार रे वाईट गेले, उरले किती कल्पना नाही. पण इच्छा असे आनंदाने क्षण-क्षण भरुन जावा, वेदनांचा साऱ्या चुरा व्हावा, शांतीचे फुले फुलावी. मनाच्या धरती-वरती होऊदे कृपा तुझी. मीळु दे सर्व मला जे उत्तम येऊन परत गेले. मीळु दे साथ खऱ्यांची, मीळु दे साथ जीव्हाळयाची तुझी, हे निसर्गा सवंगडया वेदना माझ्या जानुन, धावून ये वाचवाया. कळू दे माया तुझी मजवरती, जळु दे चिंता साऱ्या, विसरु दे जे अनआवडीचे, नष्ट होऊ दे जे नकोशे मला, अतं होऊ दे त्रासांचा, जळू दे मनुष्य सारे राहु केतु गत लाभलेले. हे परममित्रा ऐक माझी हाक जरा, नको असा नष्क्रिय होऊ. हवा आहे हात मला तुझ्या सहाऱ्याचा, गरज मला तुझी सख्या श्वासापरी. नको करु उशीर, प्राण कंठाशी दाटून आला. ये धावूनी पावसाच्या गत, प्रकाशाच्या कीरणागत, वाऱ्याच्या वेगागत. तु भेटता मन माझे त्रुप्त होईल. दुबळेपणा गळुन जाईल, आनंदाचा वर्षाव होईल, हे निसर्गा जगण्याला नवी दिशा मिळेल. स्वप्न माझे पुर्ण होईल, जीवणाचे नाही माती-मोल होणार. घडवण्या मला ज्या भोळया-भाबडया हाताने कष्ट उपसले, नाही जाणार वाया श्रम त्यांचे. दे मला शक्ती, दे मला युक्ती, या व्हयु चक्रातुन बाहेर पडण्या, ज्याने घातल्या बेडया पायात माझ्या, कर मुक्त मला, नको करु स्वामी कोणी माझा, नको बनवू गुलाम मला कुणाचे. जे आयुष्य तु मला बहाल केले, जगुदे स्वतंत्र मला माझे. नष्ट कर या परंपरा की कुणी कुणाचे काम करावे, की कुणी कोणासाठी इच्छा मारुन टाकावे. नष्ट कर हे असले रीती रीवाज, नको मला बेडयात बांधू, जी भासे जनु आहे काळया पाण्याची शिक्षा. नको ईवल्याशा जीवला छळू. गोंजारावे तु मायेने तुझ्या, बनव माझे विश्व पुन्हा नवे सर्व, नवे मनासारखे, हास्य अखंड असावे, प्रीतीचा, वारा अनंत वाहावा कणाकणातुनी, नष्ट कर आठवणी ज्या नकोशा झाल्या, तृप्त कर आत्मा नवचेतनेने, नवप्रकाशाने. कृपा तुझी झाली जर, अनंत उपकार विसरणार नही जन्मभर.

- राणी अमोल मोरे



महिलांची तारेवरची कसरत – एक सर्कस


महिलांची तारेवरची कसरत – एक सर्कस 


हा संवाद माझ्या समस्त भगीनींसाठी आहे, ज्या नेहमीच सर्कसी प्रमाणे तारेवरची कसरत करीत असतात.
           सर्कस माहीतच आहे सर्वांना. सर्कसीच्या एका प्रयोगाचा वेळ कमीत कमी १ तास तर जास्तीत जास्त ३ तास असेल कदाचित. सर्कस चालवणारा जो प्रमुख असतो तो ठरवत असेल दिवस भरातून किती प्रयोग करायचे ते. आपण गृहित धरु एका दिवसाला दोन किंवा तीन प्रयोग पूर्ण होतात आणि ही सर्कस  एखादया शहराच्या / नगराच्या ठिकाणी आली की राहत असेल एखादा महिना कमीत कमी. नाही का ? अशा कितीतरी शहरात तंबू बसत असतील. सांगण्याचे तात्पर्य एवढेच की प्रत्येक प्रयोगला जवळपास ९५% प्रेक्षक हे नवीन असतात, त्यात ५% फक्त प्रेक्षक परत सरकस पहायला येत असणार. त्यांच्यासाठी सरकसमधील प्रत्येक खेळ हा नवीनचं, प्रथमचं बघितलेला. त्यांना कंटाळा येण्याच कारणचं काय. पण कोणी ह्या प्रेक्षकांपैकी विचार केला का, की हे जे समोर तासण-तास खेळ दाखवणारे आहेत. त्यात जोकर, काही माणसे, महिला, छोटी मुले/मुली आणि प्राणी सुध्दा यांना या सर्व गोष्टींचा किती कंटाळा येते असेल. हा विचार यासाठी करा म्हणत नाही की त्या खेळ दाखवणा-यांना मग गप्प बसु दया आणि तुम्ही तसेच जा तसेच तर यासाठी म्हणते की जर एखादया वेळी तुम्हाला असं आढळल की कोणी त्यापैकी थोडं लक्ष देऊन करत नाही. किंवा एखादया वेळी तारेवरचीची कसरत करताना खाली कोसळला तर तुम्ही त्यांच्यावर पांढरीशुभ्र बत्तीसी काढून हसणं आधी थांबवाव आणि हे होत नसेल तर त्यांना शिव्या देणं तर आपण नक्कीच थांबवू शकतो ना. बघतांना फार मजा वाटत असली तरी करायला फार कठीण असतं ते, तुम्हाला नाही कळायचं कारण ‘पाण्यातला मासा, झोपी जाये कसा, जावे त्याच्या वना, तेव्हा कळे.’
            आपल्या ह्या सोंगाड्या आणि अर्थहीन कृत्याला काही अर्थ जरी नसला, तरी देखील त्याचा परिणाम मात्र वाईटचं होतो, कारण ह्या बघ्या प्रेक्षकांच्या समोर हे जे सादरकर्ते असतात ते प्रत्येक प्रयोगाला आपला जीव मुठीत धरून, सर्व शक्ती पनाला लावून हे सर्व खेळ करत असतात. प्रत्येक खेळ आणि सादरीकरण हे नेहमी उत्तम व्हावे हाच त्यांचा प्रामाणिक प्रयत्न असतो, पण अशा वेळेस एखाद्याचा थोडासा जरी तोल गेला की त्यांना त्यांच्या या चुकीबद्दल वाईट वाटलेच पण ह्या बघ्यांच्या हसण्याने किंवा शिव्या देण्याने ते आणखी अस्वस्थ होतात. त्यामुळे हवी तशी एकाग्रता त्यांना मीळू शकत नाही आणि मग त्यांच्या हातून संपुर्ण खेळ संपेपर्यंत अशा चुका होत राहतात. यासर्व गोष्टींमुळे सादरकरत्यांना आपल्या सादरी करणाबद्दल समाधन तर वाटतच नाही परंतू बघ्यांची सुध्दा निराशा होते, म्हणजे थोडक्यात काय तर  नुकसान दोन्हीकडे. यासर्व प्रकारातून बघ्यांनी काय शिकायलास पाहिजे? किंवा कोणती गोष्ट लक्षात ठेवायला पाहिजे? खेळ सादर करणारे देव नाहीत, ते सुध्दा आपल्यासारखीच माणसे आहेत आणि चुका ह्या माणसाच्याच हातून होतात, देवाच्या नाही. मग एखाद्या वेळेस कुणाकडून चुक झाली तर त्याला प्रोत्साहन द्यावं यासाठी की त्याने परत जोमाने उठून उर्वरित खेळ अगदी उत्तम रित्या कुठल्याही चुका होऊ न देता सादर करावा, जेणे करुन त्यांचे मनोबल खच्ची न होता ते आणखी वाढेल आणि तो अधीक जोमाने, आत्मविश्वासाने आणि तुमच्या आदरापोटी प्रेमापोटी आणखी उत्कृष्टरित्या समोरील खेळांचे सादरीकरण करेल आणि खेळाच्या शेवटाला तुम्हीही आनंद घेऊन परताल आणि सादरकर्ते समाधानी. यासाठी होतील की सर्वे चेहरे हे आनंद घेऊन गेलेत.
            सादरकरत्यांसाठी थोडं सांगायच झालं तर हेच की, प्रत्येक माणसं ही समजदार असतीलचं असे नाही, नेहमीच आपल्या चुकीला लोक दुर्लक्ष करुन प्रोत्साहन करतील अस होत नाही, मग अशा वेळी काय करायचं, एक गोष्ट नेहमी लक्षात ठेवायची की, शेवटी ही एक सरकस आहे, त्यात आपण सादरकर्ते आपल्या प्रयत्नाने उत्तोमोत्तम खेळ सादर करत राहायचे, अगदी शेवटापर्यंत. असे करुनही कधी तोल गेलाच तर मग स्वतःच स्वतःच्या मनाला आधी बळकटी द्यायची की काळजी नको करुस सर्व काही ठिक होईलआणि स्वतःला सावरुन समोर जात राहावे. अशा वेळेस काही बघ्यांच्या कुजबुजनं कानावर पडेल मग त्याकडे दुर्लक्ष करणेच  गरजेचे. पुढील खेळ योग्य रितीने पार पाडण्यासाठी शेवटी स्वतःचा आत्मविश्वास जाग्यावर ठेवूनच लोकांचा विश्वास तुम्ही सांभाळू शकता.
            तारेवरची कसरत करता म्हणून तुम्ही सर्कसित नाही तर, सर्मकसमध्ये असल्याने तुम्हाला ते करावं लागतं. आणखी एक गोष्ट लक्षात ठेवावी की हे सर्व प्रयोगापर्यंत मर्यादीत असावं आणि तुम्ही दिवस-रात्र सरकसच जगत जरी असाल तरीसुध्दा हे फक्त या सर्कसच्या तंबूपर्यंत मर्यादीत ठेवावं. कारण या तंबूच्या बाहेर विशाल अस जग अवती-भवती पसरलेलं आहे. सर्कसित तारेवर चालतांना तोल गेला म्हणून अस्वस्थ किंवा न्यूनगंड मनात निर्माण करु नका. कारण तंबू बाहेरील जे जग आहे तेथे तुम्हाला तारेवर चालावं लागत नाही त्या जगात चालण्यासाठी सरळ जमीनीवर रस्ते असतात. तेथे तुमचा तोल जाने शक्यच नाही कारण खेळ करतांना तारेवर चालून तुम्ही परीपूर्ण झालेले असता. माहीती आहे तुम्ही तुमचं सर्व जिवन तंबूला, बघ्यांना आणि सर्कसिला बहाल केलं, पण कधी-कधी वेळ मिळेल तेव्हा थोडा तंबूचा पडदा बाजूला करुन बाहेर एक नजर टाकत चला म्हणजे आणखी बरंच काही आहे जगण्यासाठी असं तुमचंच तुम्हाला कलेल. हे सर्व यासाठी करायच आहे. कारण तुम्ही जेव्हा स्वतःला प्रतीसाद द्याल तेव्हा संपूर्ण जग बदलण्याची शक्ती तुमच्यातच आहे हे गुढ तुम्हाला कळेल मग सर्व काही सुरळीत आणि सहजगत्या होईल. अगदी मनासारख. शेवटी सादरकर्तांचे कर्तव्यच आहे की त्यांनी बघ्यांना नेहमी खुप आणि आनंदी ठेवण्याचा प्रयत्न केला पाहिजे. चुका आणि शिकत रहा म्हणजे एक दिवस असा नक्की उजाडेल जीथे तुमच्या परिपुर्णतेची कुठेच तुलना केली जाऊ शकणार नाही. आणि मग हे बघे तुमच्या सादरीकरणाने आनंदी तर होतीलच पण जाता जाता तुम्हाला निरोप देतांना डोळ्यांत अश्रु नक्की उभे करतील, हे जो करु शकला ख-या अर्थाने त्याने संपुर्ण सर्कस जिंकली असे म्हणायला हरकतच काय.
            एकदा का सादर कर्त्याला बघ्यांची मने जींकता आली, की मग तोच त्याच्या खेळाला हवा तसा प्रतीसाद बघ्यांकडून मिळवू शकतो. त्याला वाटेल तेव्हा तो बघ्यांना हसवू शकतो, वाटेल तेव्हा रडवू शकतो, वाटेल तेव्हा आपल्या खेळातून, भावूक करु शकतो. म्हणजे एखादी जादूची कांडी फिरवावी आणि सर्व बदलून जावं तसच काहीतरी.
या सर्कसित सादरकर्त्या ह्या माझ्या सर्वं महीला भगीनी आहेत, आणि बघे हे घरातील मंडळी, नातेवाईक आहेत. सर्कसिचा निर्माता हा कुटुंब प्रमुख आहे. ह्या संदर्भातून बघितल्यास हा सर्कसिचा खेळ तुमच्या नक्कीच लक्ष्यात येईल.

--राणी अमोल मोरे



ओळख..एक स्पर्धा


ओळख...एक स्पर्धा 


     धाव धाव धावत सुटलोय जगाच्या पाठिमागे. धापा टाकल्या, दम लागला, रस्ता विसरला, कुणाचं तर आयुष्यही संपून गेलं, तरी समाधान अजुनही दूरचं दूर. कुठे धावणा-यांचा कळप, तर कुठे ऐकटेच धावत सुटले पिसाळल्यागत. कधी मेंढयांसारखे, कधी कोल्हासारखे तर कधी कुत्र्यांसारखे एक-मेकांचा पाठलाग करत. तो माझ्या बाजूला धावतो, म्हणून मी ही धावायचं त्याच्या पाठीमागे, पण तो कुणाच्या पाठीमागे धावतो, हे त्याला सुध्दा माहीती नाही तो कुणामागे आणि कशासाठी धावतो. ज्याच्या पाठीमागे तु धावत सुटतो आहेस. तीने किंवा त्याने कितीही खोटेपणाचा आव आणुन म्हटलं की मला सर्व माझ्या आजूबाजूच्या लोकांसाठी करायचं आहे. जसे की समाजासाठी, घरासाठी, परिवारासाठी, मुलाबाळांसाठी किंवा इतर कुणी प्राणी-मात्रांसाठी. जी काही कारणे असतील ती. पण वास्तवाचा सखोल अभ्यास हे सर्व वरील कारणे सांगणारे ते किंवा तीकरतील तेव्हा सत्य परिस्थितीची त्यांना जाण होते की जी कारणे आपण सांगतो त्यापेक्षा आपल्या कारणमिमांसा काही वेगळ्याच आहेत.
हि कारणे आपण तो आणि ती चे उदाहरण देऊनचं स्पष्ट केलेली बरी.
उदा. तो एखाद्या आपल्या श्रीमंत मित्रांच्या पार्टीला किंवा लग्नाला गेला, की त्याची नजर अशा ठिकाणी आधी पोहोचते ज्या गोष्टी पासून हा आजवर वंचीत आहे, जसे की हा पठया जर बँचलर असेल आणि लग्नातील मित्राची नवरी अतीशय सुंदर उच्च घराण्यातील रग्गड पैसेवाली, उच्च शिक्षित असेल व ती त्याच्या मित्राला अजीबात सुट होत नसेल तर,लगेच या पठयाचा कम्पुटर माईंड स्टार्ट होतो आणि विचार करायला लागतो. इतकी जबरदस्त मुलगी या माकडाला सुट तरी होते का? मी असतो, त्याच्या जागी तर आपल्याला नाही मिळू शकणार का अशी पार्टी? पण कशी मिळणार हा माकड फार श्रीमंत आपण साले कंगाल. कोण उभं राहणार आपल्या बाजूला? असा विचार करणारा त्याचा मास्टर माईंड वरवर जरी शट डाऊन दिसत असला, तरी आतून मात्र सुपर कम्पुटर सारखा धावत सुटलेला असतो विचारांच्या मार्गावर. तेच विचार डोक्यात घेऊन बिचारा घरी येतो आणि बस आजपासून आपणही खुप पैसा मिळवायचा, श्रीमंत व्हायचं, एवढंच डोक्यात फिट्ट करतो आणि दुस-या दिवसापासून पैशाच्या मागे धावायला सुरुवात करतो. हे झाले त्याच्या बाबतीत.
आता आपण ति चे उदा घेऊया. समजा ती नुकतीच लग्न झालेली अगदी लाडकी नव-याची बायको. नव-याने कधी कधी तीला खुष ठेवण्यासाठी ब-याच बढाया मारलेल्या असतात, तू हुशार मुलगी, सर्व काही योग्य रितीने मॅनेज करतेस. तू तर कुठल्या एका मोठ्या इनस्टीट्युट ची मॅनेजर असायला पाहिजे. असेच  दिवस निघुन जातात. एखादवेळी ती संतापते, ते पाहून बाईचा नवरा भडकतो. सप सप पाच सहा तीच्याकानाखाली वाजवतो आणि म्हणतो एक नालायक आहेस तू, कसलीच लायकी नाही तुझी, बायको होणाची किंवा या घरची सुन होण्याची. तू मला सांभाळू शकत नाही, माझ्या घरच्या लोकांना सांभाळू शकत नाही, तू काय एखादी कंपनी सांभाळशील. मग काय हे ऐकताच सत्य परिस्थितीची जाणीव (येथे सत्य परिस्थिती म्हणजे ती अयोग्य आहे असे नसुन आपला नवरा आज पर्यंत आपल्याला फक्त हरबऱ्याच्या झाडावर चढवत होता ही सत्य परिस्थिती तीच्या जेव्हा लक्षात येते तेव्हा) बाईच्या पायाखालची जमीन गायब होते. तोंडात शब्दच उरत नाहीत, डोळे सुन्न, शरीर, आत्मा मेल्यागत होतो. या सर्व परिस्थितीतून ती सैरावैरा होते. तिला आपल्यावर लावलेला हा कलंक काढायचा असतो. तीला स्वतःला सिध्द करायचे असते. म्हणून ती ही धावत सुटते. एखाद्या अशा गोष्टीमागे की त्यातून स्वतःला परिपुर्ण आणि सर्व गोष्टीच्या लायकीची फक्त तीच आहे. हे सिध्द करण्यासाठी, हे झाले तीचे आणि त्याच्या धावण्याची खरी कारणे. स्वतःला सीध्द करणे आणि स्वतःच्या आनंदासाठी खुप काही मिळविणे यासाठी. पण यापलीकडे थोडे खोलात आपण जाऊया आणि हे पडताळून पाहूया की ही जी दोन खरी कारणे आपण या तो व ती च्या बाबतीत मांडली आहे ती खरचं खरी आहेत की बरेच काही.चला तर मग हे ही आपण पडताळून पाहू.
त्याचे उदा. परत पडताळनीसाठी घेतल्यास असे लक्षात येते की तो पैशामागे धावणारा नव्हता किंवा त्याला जे हवं होत ते पैशातूनच मिळते, याबाबतीत तो गोंधळलेला होता, म्हणजे श्रीमंत लोकांचा थ्याट बघुन आपल्याला हवाहवासा आहे व त्यासाठी पैसा आवश्यक आहे याची जाणीव त्या पार्टीने किंवा लग्नाने त्याला करुन दिली त्याआधी तो याबाबतीत अज्ञानी होता. स्पष्टपणे हेच म्हणता येईल की, त्याआधी तो त्याच्या मनाच्या एखाद्या गोष्टीमागे धावत असेल किंवा धावतही नसेल, निवांत असेल किंवा आणखी काही वेगळी कारणे असतील त्याच्या धावण्यामागची, पण पैसा मुळीच नाही. तिच्याही बाबतीत सांगायचे झाले तर असेच की. प्रत्यक्षात तिला धावायचं होत कशासाठी पण त्या परिस्थितीने तिला जे कारण दिलं आज त्याच कारणामागे धावते आहे ती.
थोडक्यात काय, जर एखादं कुत्र्याचं पिलू आनंद व्यक्त करण्यासाठी किंवा खेळ खेळ म्हणून धावत असेल ऐका दिशेने आणि अचानक एका दुस-या कुत्र्याने त्याला चावा घेतला आणि पळून गेला तर हा त्याला चावण्यासाठी त्यामागे त्याच्या दिशेने धावायला लागतो. आधीच्या धावण्याचे कारण विसरुन तो चावणे या कारणासाठी त्याच्यामागे धावत सुटतो. म्हणजे काय प्रत्येक वेळेस परिस्थिती ही तुमची ऑन युअर मार्क ठरवत असते ती खरचं मार्क योग्य आहे किंवा नाही हे तुमचेच, तुम्ही ठरवून स्वतःला गेट सेट गो म्हणायचे की नाही ठरवायचे असते.
समाधानासाठी धावायचं असेल तर स्वतःसाठी धावणे थांबवा व स्वतःसाठी धावायचे असेल तर समाधान विसरा. स्वतःसाठी धावणे थांबवले ना, की धावतांना लागणारा दम, आडकाठीचा  रस्ता ह्या गोष्टी समाधान मिळविण्यासाठी अडथळा निर्माण करत नाहीत.म्हणून आयुष्यात एखाद्या गोष्टीमागे धावून आपली ओळख निर्माण करतांना त्याचा उद्देश आणि समाधान याचा विचार आधी नक्की करा.

-    --- राणी अमोल मोरे
-



Recent Posts

Mumbai’s teen innovator and author Arjit More wins International Excellence Award 2026

Teen author and innovator Arjit More from Washim has been honoured with the International Excellence Award 2026 for his research-driven writ...

Most Popular Posts