Search This Blog

Showing posts with label मराठी साहित्य. Show all posts
Showing posts with label मराठी साहित्य. Show all posts

Sunday, August 2, 2020

मायेचं बंधन..



बहीण बघते भावाची वाट
ओवाळणी कराया सजले ताट
बहरून आली श्रावण पौर्णिमा
दिसता बहीण सुखी झाला चंद्रमा

सुरेख राखीला रेशीम धागे 
भाऊ उभा बहिणीच्या पाठीमागे
चमचम राख्या हातावर फुलती
बहिणी येऊन माहेरात रमती

बहिणीस असे भावाचा लळा
ओवाळून लावी कपाळी टिळा
हातावर सजवून मायेचं बंधन
आदराने करी भावास वंदन

पेढ्याचा खाऊन अमृत घास
भाऊ बहिणीस भेट देई खास
आनंदुनी भावाबहिणीचं मन
उजळून जाई रक्षाबंधन सण

- रानमोती

Thursday, July 23, 2020

मैत्रिणींनो, छंद जोपासून आनंद व ऊर्जा मिळवा..!


प्रिय मैत्रिणींनो,

मी आज तुम्हाला माझे मत या पत्राच्या स्वरूपात लिहून पाठवीत आहे. हल्ली तंत्रज्ञानाच्या युगात, पत्राचं अस्तित्व तसं संपतच आलंय. परंतु, मी हे माध्यम खास करून तुमच्यापर्यंत पोहचण्यासाठी निवडलय, कारण पत्रात जो मायेचा, प्रेमाचा आणि आपुलकीचा जिव्हाळा वाचतांना मिळतो तो ह्या नवीन तंत्रज्ञानात कदाचित आढळणार नाही आणि हो तुम्ही सर्व माझ्या साठी खूप महत्वाच्या आहात म्हणून हा उठाठेव.
        
आपण सर्व आपल्यामध्ये अनेक छंद, अनेक वेग वेगळ्या गोष्टी जोपासत असतोच. काही तर लग्नाआधी आपल्या कला गुणांमध्ये अत्यंत पारंगत असतात. आपण प्रत्येकजण आई वडीलाकडे हट्ट धरून, आपल्या बऱ्याच गोष्टी नियमित जोपासत राहतो. मात्र, लग्नानंतर चित्र पूर्णतः बदलेलं असतं. कुटुंबाच्या जबाबदाऱ्यांमध्ये स्वतःच्या गोष्टीचा त्याग करायला महिलाच पुढे येतात. स्वतःच्या आवडी निवडीला दुय्यम स्थान कधी प्राप्त झाले हे कळण्याआधीच त्या मुलांच्या संगोपनात, संसारात पूर्णत: तल्लीन झालेल्या असतात. मला असं अजिबात म्हणायचं नाही की कुटुंबातील सदस्य आपल्याला हे सर्व करायला भाग पाडतात. बऱ्याच वेळेला ते निर्णय आपले स्वतःचेच असतात. मग ह्या चक्रव्यूहात आपणच नकळत अडकत जातो. मग तुम्ही म्हणाल, कुटुंब महत्वाचे नाही का ? नक्कीच, कुटुंब महत्वाचे आहेच. पण स्वतःसाठी वेळ देणंही तितकंच महत्वाचं नाही का ? मग काय करायचं ? असा प्रश्न उभा राहतो. या प्रश्नासाठी आपल्याकडे पर्याय आहे, तो म्हणजे, दररोज पाच मिनिटे स्वत:साठी वेळ काढा आणि शांतपणे स्वतःलाचं प्रश्न करा माझ्यात काय वेगळं आहे, मी कोण आहे ? तेव्हा जे उत्तर जास्त प्रभावीपणे अंतःकरणातून बाहेर पडेल त्याला तुम्ही लगेच प्रतिसाद द्यायला सुरुवात करा आणि हो जी पण गोष्ट तुम्ही करण्यासाठी निवडाल त्याला तुम्ही स्वत:च नकारात्मक दृष्ट्या तोलत मोजत बसु नका, तर सकारात्मक दृष्ट्या पुढे जात रहा. तुम्ही निवडलेली गोष्ट काहीही असु शकते. उदाहरणार्थ, चित्र काढणे, सजावट करणे, नृत्य करणे, बोलण्याची वेगळी पद्धत निर्माण करून इतरांना हसवणे, अगदी रांगोळ्या काढणे इत्यादींसह काहीही. 


आता तुम्ही म्हणाल यात काय मोठं. हे तर कुणीही करतं. तर मैत्रिणींनो ह्या गोष्टी वरवर जरी लहान वाटत असल्या तरी देखील तुमच्या आयुष्यात ह्या गोष्टी महत्वाच्या आहेत, त्या शोधा, त्यात काम करणं सुरू करा आणि लक्षात ठेवा हे तुम्हाला दुसऱ्यांना दाखवायचं म्हणून करायचं नाही तर फक्त स्वतःसाठी करायचं आहे. या मागचं कारण असं की, वयाच्या चाळीशीपर्यंत कदाचित तुम्ही खुप व्यस्त, चुस्त व सुंदर असाल त्यानंतर मात्र नैसर्गिकरित्या हळूहळू सारंच ओझरायला लागतं आणि मग मुलंही मोठी होतात, त्यांनाही आपली जास्त गरज जाणवत नाही. तेव्हा रिकाम्या वेळी नकारात्मकता मनामध्ये शिरकाव करून वाढू लागते आणि मानसिक आजाराला कारणीभुत ठरते. जीवनातील खरा आनंद हळुहळू नष्ट व्हायला लागतो व स्वत:बद्दलच चिडचिड निर्माण व्हायला लागते. ह्या सर्व चक्रव्युव्हात अडकण्यापूर्वी, वेळेच्या आत, स्वत:ला वाचवा. आज जरी वरवर सर्व आपली काळजी घेतांना वाटत असले तरी उद्या चित्र बदलणार आहे यात शंका नाही. म्हणून दुसरं तिसरं कोणी येऊन तुम्हाला आनंद देईल या अपेक्षेपेक्षा स्वत:च स्वत:त आनंद शोधायला सुरुवात करा. आपल्या छोट्या छोट्या गोष्टींना  छोटासा वेळ रोज देत चला आणि एक सुंदर शिदोरी जतन करत राहा, म्हणजे आज आणि भविष्यात तुम्हाला कधीही असं वाटायला लागलं की मी कोण, माझं अस्तित्व काय ? तेव्हा हिच शिदोरी तुम्हाला प्रतिसाद देत पुढे येईल आणि आनंदाने तुम्हाला खेळवून जाईल. 

आपले छंद जोपासल्याने मनाची उर्जा वाढते आणि प्रत्येक कामामध्ये एक आत्मविश्वास निर्माण करून जाते. तो आपल्या डोळ्यात आणि चेहऱ्यावर फुलत जातो, मग वय कीतीही असो. एखादा सुर्य माझ्यासाठी उगवेल आणि तेव्हा मी स्वतःसाठी काही तरी करेल या भ्रमात बसण्यापेक्षा उगवलेला प्रत्येक सूर्य स्वतःच्या नावावर करत रहा. स्वत:च्या कला गुणांना, कौशल्याला वाव देऊन त्यांना जोपासून आनंद व ऊर्जा मिळवणे हा प्रत्येक महिलेचा अधिकार आहे आणि तो त्यांनी मिळवलाचं पाहिजे म्हणूनच हा संवाद. 

धन्यवाद !
जोपासा आपला छंद, तोच देईल आनंद..!

आपली स्नेही, 
(राणी अमोल मोरे)
 



Wednesday, July 15, 2020

गावच नव्हतं पत्यावर



एका उपाशी डोंगरानं खाल्लं माझं गाव
जगाच्या नकाशावर पुसलं त्याचं नाव
सुनी सुनी वाटे रिकामी आता जागा
डोंगराने पाडल्या जणू हृद्यात भेगा

मानवाने दिल्या होत्या कटूत्वाच्या जखमा
त्याच्याच मोजल्या आज त्यांनी रकमा
तांडवाची डोंगराला आली होती लहर
सोसू नाही शकलं गाव त्याचा कहर

सकाळी पडला होता आंगणात सडा
मन हलवुन गेला पाहुन तो रडा
सारं गाव दडलं डोंगराच्या गाळात
कोणी नाही सुरक्षित कुठल्याच माळात

गाई गुरे निजली होती गवताच्या उशीत
डोंगरानं घेतलं त्यांना आपल्याचं कुशीत
सकाळची एसटी आली होती रस्त्यावर
पण गावच नव्हतं आज त्याच्या पत्त्यावर

रानमोती काव्यसंग्रहातून.....


 ©Rani Amol More

Tuesday, July 7, 2020

मशागत मनाची अन बुध्दीची निवडलेल्या ध्येय प्राप्तीची

आनंदाच्या क्षणात विसर पडला, तरीसुध्दा त्यावेळी सुप्त अवस्थेत असतेच, ते मनाच्या कोप-यात कुठेतरी दडलेलं. शिंपल्यात मोतीच जणू, शांततेत, चिंतनात, मनात, ओठांवर, डोळ्यात अगदीच सर्वत्र पसरलेलं, दुसरं तीसरं काही नाही, माझं ध्येय, माझं स्वप्न.
 
प्रत्येक सृजनशील मनुष्याचे काही स्वप्न, काही ध्येय असतात. जेव्हा मनुष्याला स्वप्न दिसायला सुरुवात होते तेव्हा तो बरीच स्वप्ने बघतो. मोठया मानसाची स्वप्ने देखील मोठी आणि इतरांपेक्षा वेगळी असतात. स्वप्न आणि ध्येय जेव्हा एक होतात तेव्हा ते झोपेत दिसनारी स्वप्ने राहत नाहीत, तर ती झोप उडवणारी स्वप्न म्हणून ओळखली जातात. मनुष्य जेव्हा माझं ध्येय, माझं स्वप्न याबद्दल विचार करायला लागतो तेव्हा जणू त्याची अवस्था एखाद्या निरव्यसनी मनुष्याने व्यसन करण्याचा विचार मनात आणावा अगदी तशीच काहीशी झालेली असते. कारण व्यसन करायच किंवा लावायच म्हणजे नशा हा जोडीला असनारच, त्याचप्रमाणे या ध्येय आणि स्वप्नांचा सुध्दा नशा येणारचं. मग त्या निरव्यसनी माणसाने सुरुवातीला व्यसनासाठी प्रोत्साहीत होऊन हळुहळु त्या व्यसनाला अंगीकारायचं. सुरुवातीला त्याचं शरीर आणि मन त्याला एकरूप होत नाही परंतु जसा-जसा वेळ जातो, तसा-तसा तो व्यसनाधीन होत जातो. मग एकदा का तो पूर्णपणे व्यसनात बुडाला की त्याला त्याच्या शरीराची, मनाची किंवा इतर कुठल्याच गोष्टीची विशेष गरज किंवा काळजी वाटत नाही. अगदी त्याचप्रमाणे मनुष्याच्या या ध्येय आणि स्वप्नांच्या बाबतीत होते. हळुहळु आपली स्वप्ने, आपली ध्येये या मार्गाने एकदा का तो लागला की तो फक्त त्यातच एकरूप होण्याचा प्रयत्न करतो. आपल्या आजु बाजुला काय चालु आहे यात तो विशेष लक्ष देत नाही. ध्येय पुर्तीसाठी जे कष्ट, सोसावे लागतात शरीराला त्या वेदना जाणवतच नाही, कारण त्या ध्येयांचा आणि स्वप्नांचा नशा त्या वेदना जाणवूचं देत नाहीत.

मनुष्याचे मन विचाराने परिपक्व झाले की तो एक ध्येय आणि एक स्वप्न परीपुर्ततेसाठी निश्चित करतो. निश्चित ध्येय व स्वप्न साकारतांना झालेल्या कष्टातुन जी अशांतता निर्माण होते ती अशांतता निश्चित ध्येय व स्वप्न साकारतांना उच्च कोटीचा आनंद, आत्मसन्मान, विशालता, परिपक्वता आणि सर्वात महत्त्वाचे म्हणजे मानसीक समाधान या सर्व गोष्टी शिकवून जाते. म्हणून ध्येय व स्वप्नांची निवड मनाने आणि तर्कशुद्ध बुद्धीने केलेली असली पाहिजे कारण त्याच दिशेने आपले मन, बुध्दी आणि शरीर धावत सुटते. हे सर्व साकारतांना भौतीक परिस्थिती कितीही प्रतिकुल असली तरी या मन, बुध्दी आणि शरीर यांच्या एकत्रीतपणामुळे त्याचा विशेष परिणाम होत नाही. मग अश्या प्रतीकुल परीस्थितीतून सुध्दा ध्येय आणि स्वप्नाने ग्रासलेला प्रत्येक मनुष्य समाधानी, शांत आणि सुखाचा अनुभव नक्कीच घेतो. 

कधी कधी हे सर्व सुरळीत चालु असतांना म्हणजे ध्येयाच्या दिशेने मार्गक्रमण करतांना एक रस्ता निवडला, नंतर जाण्यासाठी कुठले साधन बरोबरीला घ्यायचे, कुठल्या वेगाने जायचे किंवा कुठे वेग वाढवायचा आणि कुठे कमी करायचा या सर्व गोष्टी शिकून झाल्या असतांना अचानक अनुकुल परिस्थिती प्रतिकूल परिस्थितीत बदलून जावी अशी एखादी घटना घडते. एखादवेळी त्या घटनेची तीव्रता ऐवढी जास्त असते की मन, बुद्धी आणि शरीर या तीनही गोष्टींना विचलीत करण्याची शक्यता निर्माण करते. ती एका महत्त्वाच्या कारणामुळे प्रभाव करुन जाते ती म्हणजे त्यावेळची त्या मनुष्याची आर्थिक, सामाजिक परिस्थिती. मग इथेच सर्व थांबणार किंवा थांबवावे लागणार असा विचार त्याच्या मनात शिरकाव करू लागतो. त्यावेळी बुध्दी त्यावर आणखी जोर लावून त्या दिशेने शरीराला कामाला सुरुवात करते. 

म्हणजे ही वेळ अशी असावी, जणू तो व्यसनात बुडालेला व्यसनाधीन त्याला कोणी अचानक जागे करावे आणि त्याच्या वर्तमानातील गोष्टींसाठी त्याने व्यसन करणे थांबवावे मग त्याचं मन, शरीर आणि बुध्दी हे तिन्हीही वेगळे आहेत याची त्याला प्रथमच जाणीव व्हावी तसेच काही तरी. परिस्थितीच्या रोषामुळे वर्तमान गरजेपोटी तो ह्या सर्व गोष्टी थांबवेलही. परंतु तो मनुष्य खऱ्या अर्थाने जगू शकणार नाही. कारण त्याचा जगण्याचा खरा आनंद त्या व्यसनातील नशेत दडलेला असतो. तो तिथे सर्व जग विसरुन कुठल्याही शारिरीक वेदनांचा त्रागा न करता शांत असतो. परिस्थितीच्या गरजेपोटी तो आपल्या मनाच्या ध्येयाकडे जाणाऱ्या रस्त्याने जायचे थांबवतो देखील परंतु, त्याने ज्या जगण्यात रस घेतलेला असतो व त्यातील आनंद आता त्याला मिळणार नसतो त्यामुळे त्याच्या मनाची, शरीराची आणि बुद्धीची अगदी दिशाचं बदलून गेलेली असते. जेव्हा मनुष्याने ध्येय प्राप्तिसाठी एखादा मार्ग निवडलेला असतो आणि त्या मार्गाने, त्या दिशेने सम ध्येयाचे काही इतरही लोक त्याला दिसतात त्या वेळेला हा परिस्थितीमुळे ध्येयापासून दूर गेलेला त्यांना अनुभवातून आणि त्याने योजलेला योग्य मार्ग दाखवून चालायला सांगत सुटतो. परंतु,सत्य हेच असते की जास्त वेगाने तोच धाव घेतो जो आपल्या ध्येयाशी आणि स्वप्नांशी एकरुप असतो. जणू काही एकरुप मनुष्य ह्या शर्यतीतला भरधाव धावनारा ससा तर इतर कासवे

ध्येय आणि स्वप्नांचा त्याग करून गरजेपोटी निवड केलेल्या मार्गाने हा एकरुप मनुष्य चालत सुटतो. त्याला वाटते काही विशेष फरक पडणार नाही माझी खरी स्वप्ने सुटलीत तरी माझी गरज हीच आहे, ज्या मार्गावर मी आज चालतो आहे. मग हळुहळू तो त्याची ध्येये आणि स्वप्ने विसरायला लागतो आणि आहे त्या परिस्थितीत किंवा त्या जाणा-या मार्गावरच आनंद, समाधान, सुख या सर्व गोष्टींचा शोध घ्यायला लागतो. कधी कधी त्याला उगाच भास होतो की तो त्या मार्गानेही आनंदी आणि समाधानी होऊ शकतो पण तो फक्त भासच उरतो. परंतु, मनाने निवडलेलं ध्येय आणि स्वप्न त्याचा पाठलाग सतत करतच राहतात. त्याला विसर पडत नाही आणि तो ज्या मार्गाने जात असतो त्यावर तो परत परत त्याच पूर्वीच्या ध्येयाला आणि स्वप्नांना बघत सुटतो. कारण त्याचा खरा आनंद त्यातच दडलेला असतो. मग अशा वेळी जर त्याला हे कळले की ती कासवे आज त्याच्या पुढे निघुन गेलेली आहेत, तर मग त्या मनुष्याच्या मनातील अव्यवस्थेला काही सीमाच उरत नाही. त्यावेळेला त्याचं मन, बुध्दी आणि शरीर काहीतरी गमावलय या भावनेत बुडून त्याचा उजाळा वारंवार करत राहते. 

आता येथूनचं आपण आपल्या ख-या विषयाकडे वळूयात. मनाच्या व बुध्दीच्या मशागतीचा. परंतु, त्याचं तर तारतम्यचं नाही. लागेल नक्कीच लागेल. ते असं की जर एखादा मनुष्य ख-या अर्थाने त्याने निवडलेल्या ध्येयाचा व स्वप्नांचा विचार दिवस-रात्र करत असेल आणि त्याचं संपुर्ण सुख, मनाचे समाधान आणि मन:शांती जर ख-या अर्थाने त्याच निवडलेल्या ध्येयात गुरुफटलेली असेल तर तो नक्कीच त्या ध्येयापर्यंत आणि स्वप्नांपर्यंत पोहोचणार. त्यासाठी त्याला एकचं महत्त्वाची गोष्ट लक्षात ठेवावी लागेल ती म्हणजे निवडलेल्या ध्येयावर संपुर्ण लक्ष केंद्रीत करणे व त्याचबरोबर वाटेल ते परिश्रम घेण्याची तयारी. ह्या सर्व गोष्टी करतांना त्याला सर्वप्रथम गरज आहे ती त्याच्या मनाच्या व शरीराच्या मशागतीची. ज्याप्रमाणे उत्तम जोमदार पीक मिळवीण्याच्या ध्येयाने शेतकरी आपली जमीन ही चांगल्या मशागतीने कसतो, त्याचप्रमाणे योग्य त्या ध्येय प्राप्तीसाठी मनाची अन बुद्धीची योग्य मशागत होणे अत्यावश्यक आहे. ही वेळ पेरणीची नसुन ती मशागतीची आहे. ह्या वेळेला तुम्हाला सर्व क्रिया जमीनीवर करुन पुर्णपणे तयार राहायचे आहे. एकदा का पाऊस पडला की या कसलेल्या जमिनीतून तुम्ही निवडलेले बीज पेरले अन् त्या पीकाची योग्य रितीने काळजी घेतली की जोमदार पीकाचे ध्येय नक्कीच पुर्ण होणार. म्हणून मनुष्याने एकदा का आपल्या ध्येयाची बीजे कसलेल्या मनात पेरली, त्याची योग्य मशागत व त्यावर योग्य ते परिश्रम घेतले आणि त्याला संयमाचे आणि चिकाटीचे खतपाणी घातले की मनाने निवडलेल्या ध्येय प्राप्तीला उशीर मुळीच लागणार नाही. तसेच ती ध्येयप्राप्ती तुम्हाला नक्कीच तो संपुर्ण आनंद, समाधान द्विगुनीत करुन देईल ज्याची मनाने तुमच्यासाठी निवड केलेली होती. म्हणून परिस्थितीच्या गरजेपोटी अडकलेल्या ध्येय व स्वप्नांना पूर्णपणे थांबवण्यापेक्षा, विसरण्यापेक्षा योग्य वेळ येईपर्यंत एक थांबा (पॉज) घेऊन नवीन सुरवात (रिस्टार्ट) करणे गरजेचे आहे. या मध्यंतरातील काळात आपल्या मनाची व बुद्धीची योग्य मशागत आपल्या ध्येय व स्वप्नांना लागणाऱ्या गोष्टींची जमवाजमव करून एकत्र सांगड घालून करावी. जेणेकरून हा थांबा देखील आपल्याला एक नवीन उत्साहवर्धक सुरवात करण्यास प्रवृत्त करेल आणि आपण स्वत: निवडलेले आपले ध्येय व स्वप्न साकार करण्यास मदत करेल. 

- राणी अमोल मोरे


Saturday, June 27, 2020

वारी - परंपरा तीच रस्ता नवा


वारी ही अनेक शतकांपासून चालत आलेली धार्मिक, सांस्कृतिक आणि काही प्रमाणात भावनिक परंपरा आहे, जी बदलत्या काळानुसार देखील आपल्या महाराष्ट्रातील प्रत्येकाच्या मनात तशीच जपलेली आहे. विठ्ठल हे महाराष्ट्राचं आद्य दैवत. परंतु तसा तो गोर गरिबांचा दिन दुबळ्यांचा देव म्हणून ओळखला जातो. वारी या शब्दाकडे बघण्याचे दोन ठळक दृष्टिकोन आपल्याला सहज लोकमानसात बघायला मिळतील. एक म्हणजे तो वर्ग आहे जो आधुनिकतेच्या आणि प्रबोधनाच्या वाटचालीकडे वळू पाहतो व त्याच्या नजरेतून वारी ही कदाचित भोळी श्रद्धा आणि प्रदूषणाची एक लहर असू शकते. तर दुसऱ्या बाजूने एक वर्ग आहे जो आधुनिकतेला हळूहळू आत्मसात करणारा परंतु वारी ही त्याचा ‘जीव की प्राण’. ज्यामध्ये आपली संस्कृती, आपली माणसं आणि प्रत्यक्षात कधीही न दिसणाऱ्या पण एका वेगळ्याच काल्पनिक उच्च कोटीच्या भावनिक श्रद्धेने वारीच्या गर्दीत विठ्ठलाला शोधणाऱ्या ग्रामीण भागातील वर्गाचा समावेश होतो. काही तुरळक जनता अशीही असेल ज्यांना वारी तर हवी परंतु प्रदूषण किंवा आंधळा विश्वास नको अशी म्हणणारी. या सर्व घटकांचा एक सुवर्णमध्य काढण्याचा विचार आपण या लेखात पाहुयात.

चला तर मग वारीचे थोडे विश्लेषण करूया;
साधारणतः वारीला जाणारा जो वारकरी संप्रदाय आहे तो ग्रामीण भागातील आहे, असं पूर्णपणे म्हणता येणार नाही. कारण मुंबई, पुणे व पर राज्यांसहित परदेशातील भाविक मंडळीही वारीत सहभागी होत असल्याचे आपल्याला ठाऊक आहे. खूप नाही परंतु शहरी भागातील भाविकांचा सहभाग ग्रामीण भागातील भाविकांपेक्षा थोडा कमीच असतो. हे विश्लेषण या करीता, कारण वारीचा जो नवा रस्ता आपण बांधणार आहोत, त्यात यांचा सहभाग फार मोठा असणार आहे. वर्षानुवर्षे वारीत सहभागी होणाऱ्या भाविकांची संख्या वाढतांना आपण वृत्त वाहिन्यांवर ऐकत आणि बघत सुद्धा असतो. प्रत्येक वेळेला आपल्याला जाणवते एखाद्या चांगल्या व परिवर्तनवादी सुरवातीसाठी जनमाणसं एकत्र जमविणे फार कठीण आहे. आपलं हे कठीण काम विठ्ठल त्याच्या वारीच्या रूपातून कित्येक वर्षांपासून पूर्ण करीत आहे, फक्त गरज आहे ते आपण जाणण्याची. दरवर्षी पंढरपूरला जाण्यासाठी भाविक महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यातून शेकडो रस्त्यांवरून पैदल प्रवास करून येत असतात आणि या प्रवासा दरम्यान हे भाविक ठिकठिकाणी मुक्काम देखील करतात. त्यांच्या ह्याच पद्धतीचा वापर आपण प्रबोधन आणि ज्ञान संवर्धनासाठी करायला पाहिजे. म्हणजे ग्रामीण भागातील शेतकरी, कष्टकरी वर्ग, शहरी भागातील सामान्य मजूर वर्ग आणि देश विदेशातील आपल्याकडील सर्व सुख सोयीचा त्याग करून मन:शांतीसाठी आलेला परदेशी वर्ग एकंदरीत वारकरी हा आपला जमाव असणार आहे.
 
पंढरपूरला जाणारे सारे रस्ते ज्या ज्या मार्गाने वारकरी पंढरी गाठतो ते सर्व आपल्या ज्ञान संवर्धनाचे प्रभोधनाचे व आधुनिक जगाचा स्वीकार करण्याचे मार्ग ठरू शकतील. जसे की अनेक शेतकरी आत्महत्येला बळी पडतात, अश्या शेतकरी वर्गाला वारीच्या माध्यमातून जागोजागी कृषी प्रदर्शन्या भरवून शेतकऱ्यांसाठी शासनाने कोण-कोणत्या योजना आखल्या, त्यांचा फायदा कसा घ्यायचा याची इत्यंभूत माहिती तथा आधुनिक तंत्रज्ञानाला अवगत करून मार्गदर्शन करून देण्याची सोय उपलब्ध करून देता येईल. त्याच बरोबर वारकऱ्यांचा जिथे जिथे मुक्काम किंवा थांबा असतो अश्या ठिकाणी ग्रामीण भागातील लघु उद्योगांना, बचत गटांना, शेतकऱ्यांच्या समूहाला प्रोत्साहन मिळावे म्हणून आपले स्टॉल उभारणीसाठी शासनाच्या किंवा खाजगी सहभागातून मदत करता येईल. देवाच्या दानपेटीत मोकळ्या हातांनी दान करणाऱ्या श्रीमंत वर्गाचा सहभाग देखील या वारीचा रस्ता दुरुस्ती तथा सुशोभीकरणासाठी आणि ग्रामीण भागातील समस्यांचे निराकरण करण्यासाठी घेता येईल. ज्यामधून एक सामाजिक सलोखा तयार होऊन गरीबी व श्रीमंतीची दरी थोडी कमी होण्यास मदत होईल. हे सर्व करीत असतांना शहरी भागातील सामाजिक संस्थांचा सहभाग अत्यंत महत्वाचा राहणार असल्याने गाव किंवा तालुका पातळीवर त्यांचे दायित्व निर्धारित करून खऱ्या अर्थाने ग्रामीण भागातील विकासात्मक कार्यात त्यांचा सहभाग वाढवता येईल.
 
विठ्ठलाच्या दारी पोहचेपर्यंत वरिल बाबींचा अवलंब केल्यास प्रत्येक वारकरी हा ज्ञानाने आणि माहितीने समृद्ध झालेला असेल. ज्याप्रमाणे प्रत्येक क्षेत्राची समृद्धी, दबदबा हा तेथील लोकांच्या वागणुकीवरून ठरत असतो व त्या करिता त्या क्षेत्रातील प्रत्यक माणूस हा प्रशिक्षणाने व शिस्तीने तयार केला जातो. त्याचप्रमाणे जर आपण विठ्ठलाला आपलं महाराष्ट्राचं आद्य दैवत आणि वारीला आपली संस्कृती मानत असू तर तेथे जाणारा प्रत्येक वारकरी ज्ञानाने संप्पन, कर्तबगारीने समृद्ध आणि सामाजिक जाणिवांनी व स्वछतेच्या सवयीने प्रशिक्षित केलाच पाहिजे. म्हणूनच विठ्ठलाचं घर व तिथपर्यंत पोहचण्याचा मार्ग आपण ज्ञान संवर्धनाचे, सामाजिक बांधिलकीचे, विकासाचे व स्वच्छतेचे प्रतीक बनविले पाहिजे जेणेकरून ‘एक समृद्ध देवस्थान एक समृद्ध महाराष्ट्र’ अधोरेखित करेल. जेव्हा विठ्ठलाचे हे लाडके वारकरी त्याच्या गळाभेटीला समोर उभे ठाकतील तेव्हा त्यांच्या मुखावर प्रसन्नता आणि समाधान असेल आणि ते बघून विठ्ठलही अंतर्भावातून संपूर्ण महाराष्ट्राला आणि वारीच्या संस्कृतीला खऱ्या अर्थाने आशीर्वाद देईल. 

- राणी अमोल मोरे


(आजचा लेख भविष्यातील लघुकथा)

Friday, June 12, 2020

शिक्षणाच्या बाजारातील आर्थिक व मानसिक त्रासातून मुक्ततेसाठी..

शिक्षणाच्या बाजारातील आर्थिक व मानसिक त्रासातून मुक्ततेसाठी..


शिक्षण हा आज घडीला जीवनाचा मुलभूत घटक समजला जातो. बऱ्याच पालकांना आपल्या मुलांच्या शिक्षणाची चिंता सतत भेडसावत असते. आपल्या मुलांच्या शिक्षणाच्या काळजीचा फायदा घेऊन आजपर्यंत बऱ्याच नामांकित खाजगी शिक्षण संस्थांनी आपल्याला खूप लुटले आहे आणि लुटत आहेत. खरे पाहता या खाजगी शिक्षण संस्थामधून बाहेर पडणारा विद्यार्थी शासकीय शाळेतून बाहेर पडणाऱ्या विघ्यार्थ्यापेक्षा फार काय तर थोड्या चांगल्या प्रमाणात इंग्रजी बोलू शकतो आणि थोडाबहुत नीट नेटका राहून अधिकचे इम्प्रेशन झाडू शकतो.

मला इथे असे सांगावेसे वाटते जर पालक कुठल्याही ग्वाही शिवाय या खाजगी शिक्षण संस्थांनी आकारलेली अवाढव्य फीज भरून आपल्या पाल्यांना शाळांमध्ये दाखल करण्यास तयार होत असतील तर मग त्यांनी हीच मानसिकता सरकारी शाळेबाबत दाखवायला काय गैर आहे. म्हणजे उदा. महाराष्ट्र राज्याचे शिक्षण खाते आग्रह धरत असेल की शासनाच्या शाळेत मुलांना शिकवा तर काय हरकत आहे. तुम्ही म्हणाल शासनाच्या शाळेत शिक्षण हे विनामूल्य असते इथपर्यंत ठीक आहे परंतु तेथे शिक्षणाचा आणि सुविधांचा दर्जा म्हणावा तेवढा जोपासलेला नसतो. मान्य ! परंतु यावर एक चांगला उपाय आपण पालक आणि शासन मिळून राबवू शकतो. तो म्हणजे शासनाने उच्च दर्ज्याच्या पुरेश्या प्रमाणात शासकीय शिक्षणसंस्था उभाराव्यात. तसेच शिक्षणाचा दर्जा उंचवायचा असेल तर, आर्थिक बाजू अधिक भक्कम असावी लागते हे आपण पालकांनी देखील समजून घेऊन थोड्या प्रमाणात फीज च्या स्वरुपात शासनाला मदत केली पाहिजे.

आपल्याला शिक्षणाचे खाजगीकरण फार महाग पडत आहे. आयुष्यभराची सर्वं कमाई पालक फक्त आपल्या मुलांच्या शिक्षणावर खर्च करत आहेत. त्यामुळे फक्त खाजगी शिक्षण संस्थांचे मालक अधिक धनाड्य बनत चालले आहेत. महाराष्ट्र राज्याच्या शिक्षण विभागाने परिवर्तन करण्याची नितांत गरज आहे. मोठ्या मोठ्या शहरामध्ये तर खाजगी शाळांच्या फीज भरून भरून बरेच पालक अघोषित आर्थिक आणीबाणी उपभोगत आहेत. आपल्याला राज्याचा कायापालट करायचा असेल तर शिक्षणाचे वाढते खाजगीकरण त्वरित थांबविले पाहिजे. परिस्थिती हाताबाहेर जात असतांना शासनाला फक्त मराठी शाळांचा किंवा विषयाचा आग्रह धरून चालणार नाही तर काळाबरोबर बदलावे देखील लागेल. खाजगी शिक्षण संस्थांच्या वरच्या दर्ज्याच्या मुबलक शाळा जागो जागी उभाराव्या लागतील आणि ज्या जिल्हा परिषदेच्या शाळा आहेत त्यांचा देखील कायापालट करावा लागेल.

शिक्षण क्षेत्रात अत्यंत महत्वाचा घटक शिक्षक असतो म्हणून शासनाने त्यांची निवड करतांना कडक शैक्षणिक पात्रतेसह बौद्धिक आणि मानसिक निकस लावणे देखील तितकेच गरजेचे आहे हे समजले पाहिजे. एक शिक्षक फक्त बारावी पास करून डिप्लोमा केलेला नसावा तर तो उच्च विद्याविभूषित व मुलांच्या भवितव्याचा आत्मीयतेने विचार करणारा असावा. त्याच्या मध्ये शिकविण्याची कला अत्यंत प्रभावी व प्रगत असावी आणि शासनाने वेळोवेळी त्याच्या शिकवण्याच्या पद्धतीचे अवलोकन करून आवश्यक ते बदल करून घेतले पाहिजे.

महाराष्ट्र शासनाने मनावर घेतले आणि माझ्या महाराष्ट्रातील सर्वं पालकांनी शासनाच्या पाठीशी उभे राहून आपल्या पाल्यांना शासकीय शाळेत दाखल करण्याचे धाडस दाखविले पाहिजे, जेणेकरून लुटमार करणाऱ्या धनाड्य शिक्षण संस्थांना चांगली चपराक बसेल. तसेच यातून आणखी एक महत्वाची गोष्ट देखील साध्य होईल ती म्हणजे शासनाच्या नौकरयामध्ये कमालीची वाढ.

उच्च दर्जाचे शिक्षक, सर्वं सुख सुविधांनी सज्ज शासकीय शिक्षण संस्था, अघ्यावत अभ्यासक्रम, अत्याधुनिक उपकरणे आणि अभ्यासा व्यतिरिक्त खेळ, व्यायाम व सर्वांगीण विकास यावर भर देणारी शिक्षण पद्धती ही महाराष्ट्राच्या उज्ज्वल भविष्याचे गणिक ठरू शकते. सोबतच हे सर्वं साध्य होत असतांना पालकवर्ग कुठल्याही मानसिक दडपणाखाली येणार नाही याची पुरेपूर दखल घेणारा शिक्षण विभाग व मंत्री लाभणे देखील महत्वाचे. शासन, पालक व शिक्षक यांच्या प्रयत्नातून आपण शिक्षणाचे खाजगीकरण व त्यातून निर्माण झालेले बाजारीकरण थांबवू शकतो आणि ते थांबविलेच पाहिजे जेणेकरून येणाऱ्या पिढ्या  शिक्षणाच्या बाजारातील आर्थिक व मानसिक त्रासातून मुक्तता होऊन दडपण विरहित, समानतेची शिक्षण पद्धती निर्माण होईल.

जय महाराष्ट्र..!          

-    राणी अमोल मोरे


Friday, June 5, 2020

अनुवांशिकता आणि परिवर्तन

अनुवांशिकता आणि परिवर्तन


    मनुष्यामध्ये शारिरीक आणि मानसिक गुणदोष काही प्रमाणात अनुवांशिकतेमुळे मागच्या पिढीतून पुढच्या पिढीत स्थलांतरित होत असतात. शारीरिक गुणदोषांचा विचार करता लांब केस आईकडून मुलीकडे, कानावर लांब केस वडिलांकडून मुलांमध्ये तसेच काही शारिरीक आजार जसे की मधुमेह, दमा इत्यादी. आणि मानसीक गुणदोषांमध्ये भावना, बाणेदारपणा, चटकन राग येणे, हुशारी, समजुतदारपणा, समाजाबद्दल आदर या गोष्टींचा अंतरभाव करता येईल.

एखाद्या कुटुंबातील सर्वं व्यक्तींच्या गुणदोषांचा विचार करता त्या कुटुंबाची पिढ्यानपिढ्या चालत आलेली अनुवांशिकता सहज समजता येते. परंतु, शारिरीक दृष्ट्या सोडलं तर मानसीक दृष्टया अशा प्रकारची अनुवांशिकता पिढयानपिढया स्थलांतरीत करण्याचे काम काही समाज घटक देखील करीत असतात. जसे की शाळा, महाविद्यालय, शैक्षणिक संस्था, समाजिक संस्था, प्रत्येक समाज, धर्म संप्रदाय, गावे, शहरे, तालुका, जिल्हा, राज्य विभाग¸ प्रांत देश इत्यादी. मनुष्याच्या अवती-भवती असलेल्या सर्व बाबी मानसीक अनुवांशिकतेला कारणीभूत ठरतात. कळत कळत मनुष्याच्या मनाची मानसीकता या सर्व बाबींवर अवलंबून असते. हे सर्व कशाप्रकारे प्रभाव टाकते याचा आपण अभ्यास केला तर हे लक्षात येते की, जर एखादी शिक्षण संस्था (शाळा, महाविद्यालय) वर्षानुवर्षे एकाच पध्दतीने शिक्षण पिढयांनपिढ्यांना पूरवत असेल तर त्या शिक्षण संस्थेतून बाहेर पडणा-या -याच विध्यार्थ्यांमध्ये त्या संस्थेच्या शिक्षणाच्या पध्दतीचे ठसे उमटलेले दिसतात. ते असे की ती शिक्षण संस्था विद्यार्थ्यांच्या सर्वांगिक विकासासाठी झटत असेल तर तेथील बरेच विद्यार्थी सर्वांगाने विकसीत झालेले आपल्याला पाहायला मिळतात. याउलट जर एखाद्या शिक्षण संस्थेत शिक्षणाचा अपूरेपणा असेल तर तेथील विद्यार्थी पुढे जाऊन स्वत: हे सिध्द करतात. अशा प्रकारे ह्या शिक्षण संस्था कशा आहेत याचे विश्लेषण आपण तेथील विद्यार्थ्याच्या गुणदोषावरुन करु शकतो. थोडक्यात हे जर वर्षानुवर्षे अन पिढयानपिढया असंच चालत राहिलं तर त्या संस्थेची तेथील शिक्षणाची अनुवांशिकता त्या विद्यार्थीमध्ये आलेली असते. हे झाले शिक्षणाच्या बाबतीत,

आता सामाजिक संस्था, सामाजिक संघटना, समाज त्या त्या समाजातील धर्म आणि संप्रदाय पाळण्याच्या पध्दती या सर्व गोष्टींचा विचार केला तर ह्या देखील शिक्षण संस्थे सारख्याच  जबाबदार आहेत. जर एखादा समाज पिढ्यानपिढया शिक्षणाला, स्त्री-पुरुष समानतेला, नवनवीन गोष्टींचा शोध घेण्याला मान्यता देत असेल तर हीच अनुवांशिक मानसिकता पिढयानपुढ्या त्या समाजातील लोकांमध्ये उतरत जाते कालांतराने त्या समाजाची प्रगती होत राहते. या उलट, जर एखादा समाज हा धार्मिक रूढी, परंपरा जुन्या बुरसटलेल्या गोष्टीला अंधश्रध्देला थारा देत असेल तर येणा-या पिढ्यांमध्येही तीच अनुवांशिकता दिसुन येईल त्या समाजाची अधोगती होण्यास कारणीभूत ठरेल.

    गाव, शहर, प्रांत, तालुका, जिल्हा राज्य आणि देश अशाच प्रकारची अनुवांशिकता दर्शवित असतात. जर एखादे छोटेशे गाव हे स्वच्छतेला आग्रही धरुन विकास करत असेल तर ती अनुवांशिकता तेथील लोकांमध्ये दिसुन येते. एखाद्या शहरामध्ये रहदारीचे नियम योग्य प्रकारे पाळण्याची अनुवांशिकता असेल तर त्या शहरातील नागरिक इतर शहरात गेल्यावरही आपली रहदारीची अनुवांशिकता दर्शवतात. त्याचप्रकारे एखादे राज्य, प्रांत नवनवीन तंत्र ज्ञानाला उद्योगधंद्याला पुढाकार देत असतील तर तेथील जनसंख्या आपल्या या अनुवांशिकतेने आपला वेगळा ठसा उमटवतात. संपुर्ण देशाचा विचार करता भारतीय लोक हे जर गणित या विषयामध्ये प्रावीण्य मिळविलेले किंवा संशोधनात नवनवीन गोष्टी निर्माण करण्याची क्षमता सीध्द करत असतील तर ते देखील भारत देशाची अनुवांशिकताच इतर देशात गेल्यावर प्रभावीपणे दर्शवीतात. जर भरतीय लोक विना कारण बडबड करण्यात वेळ वाया घालवत असतील, तर ती देखील देशाची अनुवांशिकताच म्हणावी लागेल.

यावरुन हे सिध्द होते की, कुठल्याही कुटुंबाची, समाजाची, शिक्षण संस्थेची, धर्म संप्रदायाची, गाव, शहर, प्रांत, राज्य आणि देशाची माहीती ही तेथील मनुष्याने पिढयानपिढया दर्शविलेल्या गुणदोषावरुन मिळविता येते. शारीरिक अनुवांशिकता वगळता मानसिक अनुवांशिकता बदलने कठीन जरी असले तरी अशक्य नाही. गरज आहे ती फक्त परीवर्तनाची, पिढयानपिढ्या चालत आलेल्या दोषांना बाजूला सारुन मानव विकासासाठी, प्रगतीसाठी आणि उज्वल भवितव्यासाठी आवश्यक असलेल्या गुणांचे अवलोकन करुन ते स्वत:मध्ये रुजवून वेळोवेळी त्यात योग्य तसा बदल घडवून आणण्याची टिकवून ठेवण्याची. सोबतच अनावश्यक -प्रगतीकारक गोष्टीला बाजूला सारून मुळासगट उच्चाटन करण्याची. म्हणजे त्या वाईट गोष्टी अनुवांशिकतेने पुढच्या पिढीत स्थलांतरीत होणार नाहीत फक्त योग्य गोष्टीच वाढत जाऊन अनुवांशिकतेणे परिवर्तन येऊन मानव जातीचा पर्यायाने समाजाचा सर्वांगीण विकास साधता येईल. परिवर्तन हा सृष्टीचा नियम जरी असला तरी अनुवांशिकतेने परिवर्तन हा देखील एक नियम होऊ शकतो.

-                         - राणी अमोल मोरे 



Recent Posts

Driving Through My City

- रानमोती / Ranmoti

Most Popular Posts